सुमेध वाघमारे
नागपूर : मनोरुग्णाचा शिक्का बसल्याने त्यांचे नातेवाईकही पाठ दाखवितात. बरे झालेल्या अशा रुग्णांचा पुनर्वसनासाठी नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाने पुढाकार घेत शेती, टेलरिंगच्या कामासोबतच आता बेकरी प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी जवळपास १८ किलो ब्रेड व टोस्टचे उत्पादन घेतले. लवकरच ते केक व बिस्कीटही तयार करणार आहेत.
एकदा रुग्ण मनोरुग्णालयात दाखल झाले की, श्वास थांबेपर्यंतचं आयुष्य दगडी भिंतीच्या मागे असते, असे बोलले जाते. परंतु, प्रादेशिक मनोरुग्णालयातील चित्र आता बदलत आहे. रुग्णालयातील उपचारानंतर बरे झालेल्या परंतु नातेवाईक घरी घेऊन जाण्यास तयार नसलेल्या २००वर रुग्णांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न चालविले जात आहे. यात टाटा ट्रस्टची मोठी मदत मिळत आहे. त्यांच्या ‘उडाण’ या उपक्रमातून रुग्णांना शेतीच्या कामासोबतच ‘टेलरिंग’, ‘हाऊस किपिंग’, ‘रूम मेकिंग’, ‘फुड ट्रक’, ‘फाेटो कॉपी’ तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. आता यात बेकरी प्रशिक्षणाचाही समावेश झाला आहे. या प्रशिक्षणामुळे बरे झालेले रुग्ण आत्मनिर्भर होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
-रोज ५०वर किलो उत्पादन घेण्याचा प्रयत्न
प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, टाटा ट्रस्टच्या ‘उडाण’ या प्रकल्पांतर्गत बेकरीचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘उडाण’ उपक्रमातील ७ कर्मचारी व बरे झालेल्या ४ रुग्णांना एका खासगी बेकरीमधून प्रशिक्षण देण्यात आले. त्याच दरम्यान टाटा ट्रस्ट व त्यांना मदत करणाऱ्या विविध संस्थांच्या मदतीने २२ लाख रुपयांमधून बेकरी साहित्य विकत घेण्यात आले. जवळपास १५०० चौरस फुट जागेवर ही बेकरी उभी करण्यात आली. कोरोनामुळे बेकरीचे काम थांबले होते. परंतु गुरुवारपासून उत्पादनाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी १८ किलो ब्रेड तयार केली.
-बरे झालेल्या ६ रुग्णांना रोजगार
मनोरुग्णालयाला लागणाऱ्या ब्रेडचा पुरवठा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून केला जातो. परंतु रुग्णालयाचे स्वत:चे उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास रोज ५०वर किलो ब्रेड, टोस्ट तयार केले जातील. बाह्यरुग्ण विभागाच्या समोर एक काऊंटर उघडून बाहेरील लोकांसाठीही बेकरीचे उत्पादन विक्रीसाठी असतील. सध्या ही बेकरी दोन पाळीत चालविली जात आहे. बरे झालेल्या ६ रुग्णांना यातून रोजगार उपलब्ध झाला आहे. यात तीन महिला आहेत.
- बरे झालेल्या रुग्णांचे पुनर्वसन
मनोरुग्णालय व टाटा ट्रस्टच्या मदतीने बेकरी प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. सध्या बेकरीच्या साहित्याला मोठी मागणी आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने बेकरीचे उत्पादन वाढवून बरे झालेल्या रुग्णांना प्रशिक्षण देत त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
-डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय