तज्ज्ञांची बांधकाम विभागाला सूचना : खामला ते त्रिमूर्तीनगर मार्गावर क्रॅक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन मीटरपेक्षा जास्त उखडलेला सिमेंट रस्ता तोडा, अन्यथा तो जीवासाठी धोकादायक ठरू शकतो, अशा सूचना तज्ज्ञांच्या समितीने बांधकाम विभागाला दिल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात बांधण्यात येत असलेला खामला ते त्रिमूर्तीनगर सिमेंट रस्ता जवळपास १५ ठिकाणी उखडला आहे. त्यामुळे वाहनचालकाला त्यातून मार्ग काढताना समस्या उद्भवत आहे. तज्ज्ञांच्या सूचनेनुसार खामला ते त्रिमूर्तीनगर या दरम्यानचे उखडलेले सिमेंट रस्ते नव्याने बांधावे लागणार आहेत. नागपुरात बांधण्यात येणारे सिमेंटचे रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याची वृत्तमालिका लोकमतने छायाचित्रांसह प्रकाशित केली होती. त्याची दखल तज्ज्ञांच्या समितीने घेऊन बांधकाम विभागाला उपरोक्त आदेश दिल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रिंगरोड सिमेंट क्राँक्रिटने बांधण्याचा निर्णय घेतला होता. जवळपास ४० कि़मी. लांबीच्या मार्गावर २०५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील रस्त्यांचाही समावेश करण्यात आला. रिंगरोडचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी बांधकाम सुरू झाल्यानंतर दर्जा निकृष्ट असल्याचा अहवाल पुढे येऊ लागला. याशिवाय मनपातर्फे बांधण्यात येणाऱ्या शहरातील सिमेंट रस्त्याचाही दर्जा निकृष्ट आहे. लोकमतच्या वृत्तानंतर प्रशासनाने बांधकामाची दखल घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आशिष सिंग यांनी रस्त्याच्या पाहणीसाठी दोन तज्ज्ञांना पाठविले. त्यांनी रस्त्याच्या दर्जाची स्थिती जाणून घेतली. अनेक सिमेंट रस्त्यावर भेगा पडल्याचे त्यांना दिसून आले. रस्त्याचे उखडलेले पॅचेस तोडण्यास सांगितले आहे. बांधकाम विभागाने निर्देशाची दखल घेत उखडलेले रस्ते नव्याने बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. रिंगरोडवर आतापर्यंत जवळपास १० कि़मी. रस्त्याचे बांधकाम झाले आहे. पण अनेक ठिकाणी दोन रस्त्याला न जोडल्याने वाहनचालकाला वाहन चालविताना समस्या उद्भवत आहे. नागपुरातील तापमान वाढल्याने रस्त्याला भेगा पडल्याचा संबंधित अधिकाऱ्यांचा दावा आहे. पण नागपुरात दरवर्षी एवढेच तापमान असते, हे त्यांना माहीत असतानाही अधिकाऱ्यांचे वक्तव्य आश्चर्य व्यक्त करणारे आहे. रिंगरोड सिमेंट क्राँक्रिटचा बांधण्यासाठी केंद्राकडून दिवाळीपासून निधी आलेला नाही. आतापर्यंत केवळ ४० कोटी रुपये आले आहेत. जवळपास ४० कि़मी.चे बांधकाम सप्टेंबर २०१५ पर्यंत होणे अपेक्षित होते. पण निधीअभावी काम थांबले आहे. कामाचा वेग असाच राहिल्यास रिंगरोडचे काम पूर्ण होण्यास आणखी दोन वर्ष लागतील, अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली.
उखडलेले सिमेंट रस्ते तोडा
By admin | Published: May 19, 2017 2:47 AM