नागपूर : लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व कंत्राटदारात चांगलीच जुंपली आहे. विभागाने कंत्राटदाराच्या नोंदणीकृत दस्तावेजात त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. नोंदणीकृत दस्तातील स्वाक्षऱ्या व प्रत्यक्षात कामांची देयके उचलताना वित्तीय व्यवहारातील स्वाक्षऱ्यात तफावत असल्याने कंत्राटदाराचे एक कोटी रुपयाची देयके थांबविण्यात आली आहेत.
कंत्राटदार कंपनीचे नाव नानक कन्स्ट्रक्शन आहे. कंपनीच्या नोंदणी प्रमाणपत्रापासून ते कामगार, यांत्रिकी स्थिती व वित्तीय बाबी संशयास्पद असल्याच्या तक्रारी लघु सिंचन विभागाला मिळाल्या होत्या. त्यावरून सर्व प्रकरणाची चौकशी प्रारंभ झाली आहे. कन्स्ट्रक्शन कंपनीने भागीदारी संस्था म्हणून केलेल्या नोंदणीच्या दस्तावेजात अनेक बाबी संशयास्पद आढळून आल्या आहेत. या भागीदारी संस्थेत १५ पैकी ६ अभियंते बोगस आढळले असून, त्यांनी या संस्थेशी दुरान्वये संबंध नसल्याचे बयानपत्र लघु सिंचन विभागाला लिहून दिले. कंत्राटदाराच्या कंपनीत कामाला असलेले कामगार प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही़ त्यामुळे त्यांचा पीएफ, दरवर्षीचा उत्पन्न कर हा भरल्याच जात नसल्याचे दस्तावेजावरून दिसून येत असल्याचे कार्यकारी अभियंत्यांचे म्हणणे आहे.
- आमच्या विभागाला सहा अभियंत्यांची बयानपत्रे प्राप्त झाली आहेत. त्यांनी कंत्राटदाराच्या कंपनीशी कुठलाही संबंध नसल्याची लेखी दिले आहे़ वित्तीय व्यवहारातील स्वाक्षऱ्यात कमालीची तफावत असल्याने, जोपर्यंत चौकशी होत नाही आणि सत्य समोर येत नाही तोवर ही देयके थांबविण्यात येईल.
- रमेश गुप्ता, कार्यकारी अभियंता, लघु सिंचन विभाग, जि.प.