नागपूर : स्त्री- पुरुष समानतेचा जागर करण्यासाठी आई व मुलगी, तसेच विविध वयोगटांतील महिलांनी रविवारी नागपूर येथे महामॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन नारीशक्तीमध्ये असलेला प्रचंड आत्मविश्वासाची ग्वाही दिली.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘ब्रेक द बायस’ तसेच ‘दौड समतेची व महिला सुरक्षिततेची’ या विशेष महामॅरेथॉनचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. कस्तुरचंद पार्क येथून सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या महामॅरेथॉनमध्ये विविध गटांतील सुमारे ३५ हजार महिला सहभागी झाल्या होत्या. पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, खा. डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, महिला महामॅरेथॉनच्या आयोजन प्रमुख तथा जिल्हाधिकारी आर. विमला यांनी हिरवी झेंडी दाखवून पाच किलोमीटर स्पर्धेला सुरुवात केली. चार वर्षांच्या चिमुकलीसह ७५ वर्षांपर्यंतच्या महिलांचा सहभाग हे या महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले.
आंतरराष्ट्रीय बॉक्सर कुमारी अल्फिया पठाण, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू कोमल झांजड, चारवर्षीय धावपटू आर्या टाकोने, तसेच जगातील सर्वांत कमी उंचीची म्हणून नोंद झालेली ज्योती आमगे ही महामॅरेथॉनची प्रमुख आकर्षण ठरली. महामॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकमंत्री राऊत व क्रीडामंत्री केदार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी आर. विमला यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
- पाच किलोमीटर स्पर्धेत प्राजक्ता गोडबोले प्रथम
पाच किलोमीटर स्पर्धेत प्राजक्ता गोडबोले प्रथम आली. त्यानंतर निकिता राऊत, प्राची गोडबोले, मिताली भोयर, स्नेहल जोशी, स्वाती बंचबुद्धे, मधुरा पहाडे, प्रणाली बोरेकर, प्राजक्ता मालखेडे, स्वराली ठाकरे यांनी क्रमांक पटकावला.
-तीन किलोमीटर स्पर्धेत भाग्यश्री महल्ले विजेती, तीन किलोमीटरच्या स्पर्धेत भाग्यश्री महल्ले हिने बाजी मारली. त्यानंतर रिया धोधरे, संजना जोशी, चैताली बोरेकर, आस्था निबांर्ते, सुषमा रहांगले, आकांशा सोदिया, रिता तरारे, अंजली मडावी, विदिता मेश्राम यांनी क्रमांक पटकावला.
- दोन किलोमीटर स्पर्धेतील विजेत्या
या गटात ड्रॉ पद्धतीने उमादेवी चौधरी, अफरीन बानो, डिंपल नायडू, किरण मंडाले, बिपाशा मेश्राम, फेहमिदा बेगम मोहम्मद युसूफ, मुस्कान राधामोहन राय, मेहूल राजू कोठे, विजयंती राऊत, श्रुती कंगाले विजेते ठरले. यासोबतच महिला बचत गटामधून नूतन चौधरी, पूजा देशपांडे, ललिता गजभे, शहनाज काझी, रजनी, वंदना बारंडे, मालू शेंडे, मुबाशेरा नियाज या महिला विजेत्या ठरल्या.