खोट्या माहितीतून जुळलेल्या नात्याचा शेवटही सुन्न
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - खोट्या आणि फसव्या माहितीतून निर्माण झालेले कोणतेही नाते टिकू शकत नाही. या नात्याचा शेवट अनेकदा आयुष्य संपविणारा ठरतो. सदरमध्ये घडलेल्या महिला जळीतकांडातून ते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. रहस्यमयरीत्या जळालेल्या शबानाचे आयुष्य संपले तर तिच्या हत्येच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्याने शबानाचा प्रियकर शादाबचे आयुष्य आणि भविष्य अंध:कारमय झाले आहे.
मूळचा पाटणा(बिहार)मधील रहिवासी असलेला शादाब २००८ मध्ये नागपुरात शिक्षणाच्या बहाण्याने आला. येथे तो मेकॅनिकल इंजिनिअर झाला. येथेच त्याला गुगलसारख्या ख्यातनाम कंपनीच्या उपशाखेत जॉब मिळाला. लठ्ठ पगारामुळे शादाब येथेच स्थिरावला. बैरामजी टाऊनसारख्या पॉश भागात त्याने फ्लॅट भाड्याने घेतला. छोट्या भावालाही नागपुरात बोलवून त्याचे शिक्षण केले आणि त्यालाही ट्युशन क्लासमध्ये जॉब मिळाला. येथेच फॅमिली बनवून सेटल होण्याचे त्याने जवळपास निश्चित केले होते.
टेक्नोसॅव्ही शादाब सलग इंटरनेटच्या सफरीवर असायचा. फेसबुकवर २०१७ मध्ये त्याला शबाना (दुसऱ्याच नावाने) आढळली. प्रोफाईल चेकिंगच्या मेसेजनंतर फ्रेण्ड रिक्वेस्ट आली अन् दोघांमध्ये मैत्री झाली. मोबाईल नंबरही एक्सचेंज झाले.
शादाबपेक्षा आठ वर्षे मोठी असलेल्या शबानाने मैत्रीच्या नात्याची सुरुवातच खोट्या नावाने केली. भेटीगाठी वाढल्या. तेव्हा तिने त्याला विवाहित आहो, हे सांगितलेच नाही. दोघांचे प्रेम बहरले. लग्नाच्या निर्णयापर्यंत आले आणि... आपल्या प्रेयसीचे खरे नाव दुसरेच आहे, ती विवाहित असून दोन मुलांची आई आहे, हे कळाल्याने शादाब जाम भडकला. त्यामुळे त्यांच्यात कडाक्याचा वाद झाला. त्याने तिला फेसबुकवर, मोबाईलवर ब्लॉक केले. त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर काही दिवस दोघेही शांत राहिले. मात्र ‘तुझे माझे जमेना... तुझ्या वाचून करमेना..’ अशी दोघांचीही अवस्था होती. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा पॅचअप झाले. पुन्हा भेटीगाठी वाढल्या. परंतु अधे-मधे त्यांच्यात वाद व्हायचेच. शुक्रवारी रात्री असेच झाले. शबाना आपले कार्यालयीन काम आटोपून सरळ शादाबकडे गेली अन् त्यांच्यात वाद झाला. या वादात शबानाचा जीव गेला तर, तिची हत्या केल्याच्या संशयावरून पोलिसांनी शादाबला अटक केली. बनावट आणि खोट्या माहितीतून जुळलेल्या नात्याचा शेवट सुन्न करणारा ठरला.
रहस्य गडद
या प्रकरणाचे रहस्य गडद करणारे अनेक प्रश्न आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, ती जळाली कशी, शबानाने स्वत:ला जाळून घेतले की शादाबने तिला जाळले. दुसरे म्हणजे, ती रुग्णालयात पोलिसांना मृत्यूपूर्व जबानी (डाईंग डिक्लिरेशन) देताना खोटी का बोलली. शादाबने जाळले की स्वत: जळाली, हे तिने पोलिसांना न सांगता भलतीच घटना आणि भलतेच ठिकाण का सांगितले, हे शबानाशी संबंधित प्रश्न आहेत. तर, शादाबने लगेच पोलिसांना का माहिती दिली नाही, असाही प्रश्न आहे. या सर्व प्रश्नांच्या जाळ्यात अडकलेला शादाब आता अंधारकोठडीत पोहचणार आहे.