सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरातील स्त्रियांच्या मृत्यूचे सर्वांत मोठे कारण स्तन कर्करोग आहे. राज्याचा विचार केला तर या कर्करोगात विदर्भ दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावर प्रभावी उपचार करण्यासाठी नव्या पद्धतीचे ‘ब्रॅकेथेरपी’ व ‘लिनिअर एक्सिलेटर’ यंत्र महत्त्वाचे मानले जाते. परंतु आशिया खंडातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाच्या मेडिकलच्या कर्करोग विभागाकडे ‘कोबाल्ट’ व ‘ब्रॅकेथेरपी’यंत्र कालबाह्य झाले आहे. असे असतानाही, या यंत्रामधून उपचार केले जात आहे. स्तन कर्करोगासोबतच इतरही कर्करोगाचे रुग्ण प्रभावी उपचारापासून वंचित आहेत.भारतात १९८२-८३ मध्ये कर्करोगात गर्भाशय मुखाचा कर्करोग नंबर एकवर होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) होता मात्र मागील ३० वर्षात यात बदल झाला आहे. हा कर्करोग जगभरातील स्त्रियांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. यात दगावणाऱ्या एकूण महिलांपैकी एकट्या भारतातील २३ टक्के महिलांचा समावेश आहे. हा आकडा ७० हजारांच्या घरात जातो. राज्याचा विचार केला तर मुंबईत हे प्रमाण ३३ टक्के असून विदर्भ दुसऱ्या स्थानी आहे. एकट्या नागपुरात हे प्रमाण ३२ टक्के असल्याची माहिती आहे. या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी विदर्भात नागपुरातील एकमेव मेडिकल आहे. येथील कर्करोग विभागाच्या विकासासाठी केंद्र सरकारने २००५ मध्ये २ कोटी ८८ लाख रुपये दिले होते. या निधीतून २००६ मध्ये ‘कोबाल्ट’ तर २००९ मध्ये ‘ब्रॅकेथेरपी’ यंत्र उपलब्ध झाले. सुरुवातीला काही वर्षे या दोन्ही यंत्राचा फायदा कर्करोगाच्या रुग्णांना झाला, परंतु नंतर नव्या उपचार प्रणालीसमोर ये यंत्र मागे पडले. परंतु आजही याच जुनाट व कालबाह्य झालेल्या यंत्रावर कर्करोगावरील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, ‘ब्रॅकेथेरपी’ यंत्र स्तन कर्करोगाच्या रुग्णांना रेडिएशन देण्यासाठी महत्त्वाचे मानले जात असलेतरी हे यंत्र तीनच चॅनलचे आहे. स्तन कर्करोगाच्या रुग्णांसाठी १७ ते १८ चॅनलची गरज असते. यामुळे या यंत्राचा फायदा रुग्णांना होत नाही. या रुग्णांना ‘कोबाल्ट’मधून रेडिएशन दिले जाते.
अद्ययावत उपचारासाठी जीवघेणी प्रतीक्षामेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याची घोषणा २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती, परंतु तेव्हापासून हे इन्स्टिट्यूट कागदावरच आहे. इन्स्टिट्यूट स्थापनेबाबत दाखल जनहित याचिकेवर जून २०१७ मध्ये न्यायालयाने दोन वर्षांत कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारावे, असे निर्देश दिले होते. मात्र अद्यापही बांधकामाला सुरुवात झाली नाही. दरम्यानच्या काळात मेडिकलच्या रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन म्हणून ‘कॅन्सर हॉस्पिटल’ला परवानगी देण्यात आली. बांधकामासाठी ७६ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. यामुळे लवकरच बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. परंतु बांधकाम पूर्ण होईपर्यंत व रुग्णसेवा सुरू होईपर्यंत तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत मेडिकलच्या गरीब रुग्णांना अद्ययावत उपचारासाठी जीवघेण्या प्रतीक्षेला सामोर जावे लागणार आहे.