लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्वी वाढत्या वयासोबत स्तनाच्या कर्करोगाची जोखीम वाढायची. आता ३० ते ४० वर्षे वयोगटातील महिलांमध्येही हा रोग दिसून येऊ लागला आहे. धक्कादायक म्हणजे याचे प्रमाण ५० टक्के असून मृत्यूचा धोका ४० टक्के आहे. यामागील नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र, या वयात हार्माेन उग्र राहत असल्याने ककरोग झपाट्याने पसरतो, असे म्हणता येईल. भारतात दरवर्षी स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) दोन टक्क्याने वाढत आहे, अशी माहिती राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरने गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.यावेळी हॉस्पिटलचे सहसंचालक डॉ. बी.के. शर्मा, डॉ. प्रसन्ना जोशी, डॉ. प्रफुल्ल चहांदे, डॉ. डी.पी. सेनगुप्ता, डॉ. अमोल हेडाऊ, डॉ. महेश क्रिपलानी व डॉ. के.आर. रणदिवे आदी उपस्थित होते.डॉ. जोशी म्हणाले, शहरी भागात महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग पहिल्या स्थानावर तर ग्रामीण भागात गर्भाशय मुखाचा कर्करोग पहिल्या स्थानावर आहे. देशात दरवर्षी एक लाखांपेक्षा जास्त महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग दिसून येतो. शहरात ३० पैकी एका महिलेला तर ग्रामीण भागात ६० पैकी एका महिलेला हा कर्करोग होण्याची शक्यता असते. स्त्रियांमध्ये होणाऱ्या सर्व कर्करोगापैकी ३० टक्के रुग्ण हे स्तनाच्या कर्करोगाचे असतात. या रोगाचे तिसºया किंवा चौथ्या टप्प्यात निदान होण्याचे प्रमाण ५० टक्के आहे. या टप्प्यात उपचाराला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने मृत्यूचा धोका वाढतो. या तुलनेत पाश्चात्त्य देशात ७५ टक्के रुग्णांचे पहिल्या स्टेजमध्येच निदान होते. तरुण वयात स्तनाचा कर्करोग वाढण्याचे प्रमाण ५० टक्के आहे, असेही ते म्हणाले.
तरुण वयात स्तनाचा कर्करोग ‘अॅग्रेसिव्ह’ डॉ. चहांदे म्हणाले, तरुण वयात स्तनाचा कर्करोग ‘अॅग्रेसिव्ह’ असतो. या मागील काही कारणांपैकी, हार्माेन्समध्ये बदल, उशिरा लग्न, उशिरा गर्भधारणा, अधिक मुले होऊ न देणे व अयोग्य स्तनपान ही काही कारणे आहेत. तरुण वयातील कॅन्सरमध्ये उपचारानंतरही रोग पसरण्याची किंवा परतून येण्याची शक्यता अधिक असते. यामुळे या रोगाची जनजागृती गरजेची आहे. स्तनात किंवा काखेमधील गाठीची त्वरित तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरते.
मोबाईल कर्करोग निदान व्हॅन ठरणार वरदानडॉ. शर्मा म्हणाले, कर्करोगाचे पहिल्या टप्प्यातच निदान झाल्यास कर्करोग पूर्णत: बरा होण्याची शक्यता असते. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलने ‘मोबाईल कर्करोग निदान व्हॅन’ तयार केली आहे. या ‘व्हॅन’मध्ये स्तन, गर्भाशय, मानेचा व मुखाच्या कर्करोगाचे निदान करण्याची सोय आहे. १५ ऑक्टोबरपासून ही व्हॅन रुग्णसेवेत असणार आहे.