लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीयांच्या प्राचीन आणि आरोग्यदायी जगण्याचे प्रतीक असलेली योगसाधना ही केवळ सामान्य माणसांच्या आरोग्याची गुरुकिल्ली नाही तर विविध आजाराने पीडित रुग्णांच्या उपचाराचेही गमक आहे. ब्रेस्ट कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारातून सहीसलामत निघालेल्या विजेत्यांच्या सुखरूप व निरोगी जीवनासाठी योग हे प्रभावी साधन आहे. त्यामुळे कॅन्सर विजेत्यांनो योग करा आणि निश्चिंत रहा, असे आवाहन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व या आजारावर मात केलेल्या डॉ. रोहिणी पाटील यांनी केले आहे.ब्रेस्ट कॅन्सर हा भारतात होणारा कॉमन आजार आहे आणि महिलांसाठी तो वेदनादायक आहे. ब्रेस्ट कॅन्सरचे निदान आणि त्यावरील उपचाराची प्रक्रिया ही रुग्णाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम करणारी असते. उपचार घेऊन आजारातून बरे झाल्यानंतरही हा वेदनेचा प्रवास आणि धोका संपत नाही. अशावेळी उपचार घेणारे ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण आणि त्यावर मात करणाऱ्यानाही भविष्यात आजाराचा धोका टाळण्यासाठी योग ही समांतर थेरपी आहे, असा दावा डॉ. पाटील यांनी केला. योगामध्ये व्यायाम, स्ट्रेचिंग आणि श्वासोच्छ्वास हे तिन्ही महत्त्वाचे घटक सामावलेले आहेत. हे तिन्ही घटक रुग्णांचे शारीरिक व मानसिक गुणवत्ता वाढण्यासाठी महत्त्वाचे असून त्यामुळे योग केल्याने ब्रेस्ट कॅन्सर रुग्ण व विजेत्यामध्ये सकारात्मक बदल घडून येतो. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर रुग्ण व विजेत्यांनी नियमित योग केल्यास भविष्यात होणारे दुष्परिणाम सहज दूर ठेवता येतील, असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.- योगामुळे मेंदू आणि शरीराचे तार एकाचवेळी जुळून येतात हे प्रयोगातून सिद्ध झाले आहे.- एकाचवेळी व्यायाम, ध्यानसाधना आणि श्वसन तंत्रामुळे मन शांत राहते.- योग करताना होणाऱ्या स्ट्रेचिंग, ब्रिदींग व खांद्याच्या हालचाली ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांना लाभदायक आहेत. यामुळे उपचारानंतर भविष्यात होणारा लिंफोडीमाचा जीवघेणा धोका टाळता येतो.- रुग्णाना शांत झोप लागण्यास मदत होते, थकवा कमी होतो व शरीराची लवचिकता वाढते.- स्टॅमिना व शक्ती वाढते. तणाव, भीती आणि डिप्रेशन योगामुळे दूर होते.
ब्रेस्ट कॅन्सर विजेत्यांनो, योग करा आणि निश्चिंत रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:01 PM
ब्रेस्ट कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारातून सहीसलामत निघालेल्या विजेत्यांच्या सुखरूप व निरोगी जीवनासाठी योग हे प्रभावी साधन आहे. त्यामुळे कॅन्सर विजेत्यांनो योग करा आणि निश्चिंत रहा, असे आवाहन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व या आजारावर मात केलेल्या डॉ. रोहिणी पाटील यांनी केले आहे.
ठळक मुद्देस्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील यांचे आवाहन