नागपूर : बाळाला चमच्याने मातेचे दूध देण्याचा प्रयत्न केला, पण प्रकृतीमुळे त्याला हे दूधही पचत नव्हते. बाळाचा जन्म झाल्यावर ते रडले नसल्याने मेंदूला आॅक्सिजनचा पुरवठा होत नव्हता तर फुफ्फुसात संसर्ग झाल्याने बाळाचा श्वास कमी झाला होता. त्या चिमुकल्या बाळाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले, पण उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. वडील दीपक यांचे अवसानच गळाले. चिमुकलीला वाचविण्यात यश आले तरी मानसिक अपंगत्व राहण्याचा धोका डॉक्टरांनी सांगितला होता. सहा दिवसांच्या उपचारानंतर अखेर चिमुकलीचा श्वास आज थांबला. २१ नोव्हेंबरला तिचा जन्म सकाळी ५.१७ ला झाला होता. २७ नोव्हेंबरला अवघ्या सहा दिवसांचे आयुष्य जगून जन्माच्याच वेळी अर्थात सकाळी ५.१७ वाजता या चिमुकलीचा श्वास थांबला. मातेचे दूधही घेता आले नाही आणि जन्मदात्रीला डोळे उघडून पाहताही आले नाही. पण त्या चिमुकलीला आपल्या मातेचे दर्शन घेण्याची आस असणारच. नऊ महिने जिच्या पोटात होती, त्या मातेची ओढ त्या चिमुकल्या जीवाला असणारच. डॉक्टरांनी अखेर नको तो निरोप दिलाच. चिमुकली आता या जगात नाही. बापावर आभाळच कोसळले. तिच्या मातेला कसे सांगावे, हा प्रश्न काळीज चिरणाराच. पण अखेर सांगावेच लागले. हुंदका आवरता आवरत नव्हता. ज्या आनंदाने बाळाला जन्म देण्यासाठी रुग्णालयात गेलो. तेथून बाळाचे कलेवर घेऊनच परतावे लागेल, याची कल्पनाही नरांजे कुटंबीयांना नव्हती. सारेच सुन्न झाले. हातात आपल्याच चिमुकलीचे कलेवर घेऊन दीपक खिन्न मनाने सुन्न होऊन घराकडे निघाले आणि त्यांना अवयवदानाचे होर्डिंग दिसले. आपली पिल्लू तर या जगात नाही, पण तिचे अवयव कुणाच्या कामी आले तर...दीपक पुन्हा मेडिकलमध्ये परतले. इवल्याशा चिमुकलीचे अवयव कुणाच्या कामी येऊ शकतील? डॉक्टरांनाही प्रश्न पडला. तिच्या बापाच्या दिलेरीने डॉक्टरही गहिवरले. पण किमान तिच्या डोळ्यांनी कुणीतरी जग पाहू शकेल, हा विश्वास डॉक्टरांना होता. त्वरित तयारी करण्यात आली आणि तिचे डोळे काढण्यात आले. चिमुकलीचे डोळे निरोगी होते. पण क्षीण शक्तीमुळे तिला या जगात डोळेही उघडताच आले नाही. आता तिचे डोळे कुणाला तरी लावण्यात येतील आणि चिमुकलीच्या डोळ्यांनी तो जग पाहू शकेल. बाळ तर दगावले, पण तिचे डोळे या जगात असतील. डोळ्यांच्या रूपाने आमची चिमुकली जिवंत राहील, असे दीपक आणि दीक्षापाली यांनी डबडबल्या डोळ्यांनी सांगितले तेव्हा आपसुकच सर्वांच्याच पापण्या ओलावल्या. स्वत:चे आभाळाएवढे दु:ख बाजूला सारून आपल्या चिमुकलीचे नेत्रदान करणारा हा बाप आणि माता यांनी जगात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांना सलामच केला पाहिजे. (प्रतिनिधी)मेडिकलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने निधन५ नोव्हेंबरपासून दीक्षापाली मोडिकलमध्ये भरती होत्या. १९ नोव्हेंबरला डॉक्टरांनी सीझर करावे लागेल, असे रात्री ८ वाजता सांगितले. त्यासाठी सलाईनसोबत काही इंजेक्शनही दिले गेले. त्याच दिवशी रात्री दीक्षापाली यांना अस्वस्थ वाटत असल्याने तपासणी केली असता, बाळाचे ठोके कमी झाल्याचे लक्षात आले होते. रात्रभर दीक्षापाली वेदनांनी तडफडत होत्या. पण वारंवार सांगूनही कुणी लक्ष दिले नाही. मुळात रात्री कुणीही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता. त्वरित उपचार मिळाले असते तर बाळाच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झाले नसते. त्यामुळेच बाळाचे ठोके कमी झाले होते. रात्री डॉक्टर उपस्थित नसल्याने अख्खी रात्र दीक्षापाली यांना तळमळत काढावी लागली, असा आरोप दीपक नरांजे यांनी केला. बाळाच्या जन्मापूर्वी पोटात ते सुदृढ होते आणि त्याचे वजनही तीन किलो होते, असे दीपक म्हणाले.
चिमुकलीचा श्वास थांबला
By admin | Published: November 28, 2014 1:02 AM