सुखी माणसाचा सदरा कुणाला शोधूनही सापडत नाही म्हणतात़ पण, म्हणून काही सुखाचा शोध घेणे थांबत नाही़ ज्यांना विश्वास असतो आपल्या कर्तृत्वावर अन् ज्यांच्यात धमक असते जग बदलण्याची ते घालतात घाव अंधारलेल्या रात्रीच्या माथ्यावर आणि ओढून आणतात यशाची मंजुळ पहाट. प्रतिकूलतेच्या चक्रव्यूहातूनही शिक्षणाचा मंगलकलश खेचून आणणाऱ्या या विद्यार्थ्यांचेही असेच आहे़... जन्मापासूनच पूर्णत: दृष्टिहीन असलेल्या दिविजा सुतोणे हिने कला शाखेत ८८.६० टक्के गुण मिळविले आहेत. विशेष म्हणजे दहावीतदेखील ती ८७ टक्के गुणांसह प्रथम आली होती. आईवडिलांचे छत्र हरवले. घरची बेताची परिस्थिती अशा बिकट परिस्थितीवर मात करीत मनाच्या साने गुरुजी उर्दू उच्च प्राथमिक शाळेच्या निखत परवीन जिब्राईल खान हिने कला शाखेत ७५.०७ टक्के गुण मिळविले. जन्मत: कर्णबधिर असलेला ओजस ११ व्या वर्षी वडिलांचे छत्र हरवून बसला. अशात पुरुष म्हणून घरची जबाबदारी त्याच्यावर आली. पण शिक्षणाची जिद्द त्याने सोडली नाही अन् हतबलही झाला नाही. आईला बँकेमध्ये सफाईचे काम करावे लागते ही बाब मनात सलत असल्यामुळे अवंती पवन सहारे या मुलीने बँक अधिकारी होण्याचा चंग बांधला आहे. प्रतिकूल परिस्थितीत तिने ८५ टक्के गुण मिळविले आहे. हिस्लॉप कॉलेजच्या शुभम वीरेंद्र नंदेश्वर या मुलाने स्वत:च्या अंधत्वावर व घरच्या आर्थिक कमतरतेवर मात करून बारावीच्या परीक्षेत कला शाखेत ८०.०६ टक्के गुण मिळविले. जाईबाई चौधरी कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी असलेल्या स्वाती रमेश डागमवारने अस्थायी नोकरी सांभाळून बारावीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण मिळविले.
ब्रीद संघर्षाचे....यश प्रतिभेचे...
By admin | Published: May 31, 2017 2:41 AM