लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चोरीच्या उद्देशाने वस्तीत शिरलेल्या एका दाम्पत्याला जमावाने बेदम मारहाण केली. पुरुष चोरट्याला एकाने चक्क फरफटत नेले. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता लक्षात आल्यामुळे दोन्हीकडून तक्रार देण्याचे टाळण्यात आले आहे.
रविवारी दुपारी ३ च्या सुमारास एक महिला आणि पुरुष सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहन नगरात शिरले. त्यांनी त्या भागातील मोहम्मद समीर नामक व्यक्तीची गाय चोरून नेण्याचा प्रयत्न केला. जमावाने महिला आणि पुरुषाला अन्नपूर्णा हॉटेलजवळ पकडले. यापूर्वीही आरोपीने त्या भागात चोरी केली आणि पळून गेले होते. ते हेच आरोपी असावेत, असा समज झाल्यामुळे संतप्त जमावातील रोशनसिंग भीमसिंग (वय २७) आणि सचिन नारदेलवार (वय ३६) या दोघांनी त्यांच्याही गाई यापूर्वी चोरीला गेल्यामुळे संशयित चोरट्याला शिवीगाळ केली. पवन नामक पुरुष आणि महिलेला बेदम मारहाण केली. पुरुषाला एका आरोपीने चक्क रस्त्याच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर फरफटत नेले. विशेष म्हणजे घटनास्थळी यावेळी मोठा जमाव होता. मात्र त्यातील कुणी पोलिसांना माहिती देण्याची तसदी घेतली नाही. सायंकाळी एका खबऱ्याकडून माहिती कळताच सदर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि वस्तीतील नागरिकांना विचारपूस केली. काहींना पोलीस ठाण्यातही आणले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून स्टेशन डायरीत सविस्तर नोंद घेण्यात आली. दरम्यान, मंगळवारी सकाळी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. त्याची दखल घेत अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी लगेच सदर पोलिसांकडे विचारणा केली. पोलिसांनी धावपळ करून पुन्हा घटनास्थळ गाठले. मारहाण करणाऱ्या आरोपीबाबत विचारणा करून वस्तीतील काही जणांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यांनी या घटनेच्या संबंधाने उपरोक्त माहिती दिल्यानंतर पवन नामक कथित चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक त्याच्या जरीपटक्यातील घराकडे पोचले. मात्र, तो घरी नव्हता. चोरीच्या आरोपात पोलीस कारवाई करतील म्हणून त्याने पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचे टाळून पळ काढला असावा, असा संशय आहे. तर, त्यांना बेदम मारहाण केल्याच्या आरोपाखाली आपल्यावर ही कारवाई होऊ शकते म्हणून मारहाण करणाऱ्यांनी चोरीच्या संबंधाने तक्रार नोंदविल्याचे टाळल्याची माहिती पुढे आली.
----
पोलिसांकडून शोधाशोध
प्रकरण गंभीर असल्यामुळे पोलिसांनी घटनेची माहिती कळताच रविवारी रात्रीपासून ज्याला मारहाण झाली त्या पवन आणि सोबतच्या महिलेचा शोध सुरू केला. मात्र कारवाईच्या भीतीमुळे ते दाम्पत्य घराकडे फिरकले नाही. पोलीस त्यांना शोधत असून ते हाती लागल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाणार आहे.
---