‘एसीबी’ची कारवाई : १० हजार रुपयांची मागितली लाचसावनेर : वनपालास प्रवासभत्त्याची बिले पास करून धनादेश देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वनरक्षकास तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी सावनेर तालुक्यातील खापा येथील वन परिक्षेत्र कार्यालयात करण्यात आली. महादेव श्रीकृष्ण कुलकुले (४५, रा. खापा, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर वनरक्षकाचे नाव आहे. तक्रारकर्ता हा वन परिक्षेत्र कार्यालय सेमिनरी हिल्स, नागपूर येथे वनपाल (श्वान पथक) पदावर कार्यरत आहे. तक्रारकर्ता हा मे २००९ ते मे २०१२ या काळात खापा वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या खुबाळा उपवन परिक्षेत्रात वनपाल पदावर कार्यरत होता. त्याने या काळात खासगी वाहनाने वन परिक्षेत्राची गस्त केल्याने त्याने दर महिन्याला प्रवासभत्ता बिल (टी.ए.) खापा वन परिक्षेत्र कार्यालयात सादर केले. दरम्यान, या कार्यालयातील वनरक्षक महादेव कुलकुले याने बुधवारी (दि.४) तक्रारकर्त्यास फोन केला आणि त्यांना प्रवासभत्त्याची रक्कम मंजूर झाली आहे. २००९ ते २०११ या काळातील ही रक्कम ६० हजार रुपये असून, या रकमेचा धनादेश घेण्यासाठी आपल्याला १० हजार रुपये द्यावे, अशी बतावणी केली. ही रक्कम देण्याची तक्रारकर्त्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने गुरुवारी (दि.५) सकाळी नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे ‘एसीबी’च्या पथकाने सापळा रचला.ठरल्याप्रमाणे कुलकुले याने तक्रारकर्त्यास खापा वन परिक्षेत्र कार्यालयात १० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. ही रक्कम स्वीकारत असताना कार्यालयाच्या परिसरात दबा धरून बसलेल्या ‘एसीबी’च्या पथकाने त्याला रंगेहात पकडले आणि अटक केली. त्याच्याविरोधात सीताबर्डी, नागपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई ‘एसीबी’चे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनात ‘एसीबी’च्या पोलीस निरीक्षक भावना धुमाळे, मोनाली चौधरी, चंद्रशेखर ढोक, मंगेश कळंबे आदींनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)
लाचखोर वनरक्षकास अटक
By admin | Published: May 06, 2016 3:13 AM