लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात २० टक्के रक्कम लाच मागणारी महिला क्रीडा अधिकारी त्रिवेणी नत्थूजी बांते (वय ३९) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) आज जेरबंद केले. क्रीडा अधिकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याची विकेट गेल्याने गुरुवारी सायंकाळी मानकापूर कार्यालय परिसरात चांगलीच धावपळ वाढली होती.तक्रार करणारी व्यक्ती मानकापुरातील रहिवासी असून, महेंद्र बहुद्देशीय शिक्षण संस्था परसोडी, पारशिवनी या संस्थेची सचिव आहे. ही संस्था निमशासकीय असून धर्मादाय आयुक्त कार्यालयात तिची नोंदणी झालेली आहे. सन २०१८-१९ या वर्षात युवक कल्याण प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी मंजुरी मिळावी म्हणून तक्रारकर्तीने जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव क्रीडा अधिकारी त्रिवेणी बांते यांनी मंजूर करून संस्थेच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम २५ हजार जमा केली. संस्थेच्या लेखा परीक्षणासाठी अनुदान मंजुरीची प्रत आवश्यक असल्याने ती मिळावी म्हणून तक्रारकर्ती व्यक्तीने क्रीडा अधिकारी बांते यांची भेट घेतली. बांते यांनी तिला पाच हजार लाचेची मागणी केली. २५ हजारांच्या अनुदानासाठी चक्क २० टक्के रक्कम लाच मागत असल्याने संबंधित व्यक्तीने सरळ एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारपासूनच सापळा लावला. ठरल्याप्रमाणे संबंधित व्यक्ती लाचेची रक्कम घेऊन बांतेकडे गेली. बांतेने लाचेचे पाच हजार स्वीकारताच बाजूला दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिला जेरबंद केले. क्रीडा अधिकारी लाच घेताना पकडली गेल्याने कार्यालय परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. बांतेला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याविरुध्द मानकापूर ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस आयुक्त श्रीकांत धिवरे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
नागपुरात लाचखोर क्रीडा अधिकारी जेरबंद : क्रीडा वर्तुळात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:59 AM
शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात २० टक्के रक्कम लाच मागणारी महिला क्रीडा अधिकारी त्रिवेणी नत्थूजी बांते (वय ३९) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) आज जेरबंद केले. क्रीडा अधिकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याची विकेट गेल्याने गुरुवारी सायंकाळी मानकापूर कार्यालय परिसरात चांगलीच धावपळ वाढली होती.
ठळक मुद्देएसीबीने घेतली विकेट