नागपूर : घराची फेरफार नोंद करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या परीरक्षण भूमापन अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. ही कारवाई बुधवारी सिव्हील लाईन्स येथील प्रशासकीय इमारत क्रमांक १ मधील भूमापन कार्यालय क्रमांक ३ येथे करण्यात आली. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली. भितीपोटी काही कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून पळ काढल्याची चर्चा होती.
प्रकाश बाळकृष्ण निंदेकर (वय ४६, ) असे लाच घेणाऱ्या परीरक्षण भूमापन अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झिंगाबाई टाकळी येथील एम. बी. टाऊनमधील रहिवासी यांना त्यांच्या आईवडिलांच्या मालकीच्या घराचे मालकी हक्काचे फेरफार करून घ्यावयाचे होते. त्यासाठी ते भूमापन कार्यालय क्रमांक ३ (सिटी सर्व्हे कार्यालय) येथे चकरा मारत होते. परंतु परिरक्षण भूमापन अधिकारी प्रकाश निंदेकर यांनी फेरफार करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ही रक्कम त्यांनी स्व:त स्वीकारण्याची तयारी दर्शविली. परंतु तक्रारकर्त्या व्यक्तीला लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक राहुल माकणीकर यांच्याकडे तक्रार केली.
त्यानुसार एसीबीने सापळा रचून बुधवारी प्रकाश निंदेकर यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांना अटक करून सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीच्या उपअधिक्षक अनामिका मिर्झापूरे यांच्या पथकाने केली.