हिंगणा : हिंगणा तालुक्यातील सावंगी देवळी येथे वीट भट्टीच्या खड्ड्यात बुडून आरुषी व अभिषेक राऊत या दोन चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत झाला. यापार्श्वभूमीवर नागरिकांचा रोष विचारात घेता तालुका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून नाल्यातील जीवघेणे खड्डे बुजविण्यास मंगळवारी सुरुवात करण्यात आली.
आरुषी आणि अभिषेक या चिमुकल्यांचा मृत्यू खड्ड्यातील पाण्यात बुडून झाल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले आहे. त्यामुळे तहसीलदार संतोष खंडारे यांच्या आदेशानुसार नाल्यातील जीवघेणे खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली. यात आमगाव येथील एक खड्डा तर सावंगी देवळी येथील तीन खड्डे बुजविण्याची सुरुवात झाली आहे. याबाबत नायब तहसीलदार महादेव दराडे यांनी मंडळाधिकारी नरेश कावळे व मुकुंद मडावी यांना लेखी पत्र देत त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच ज्या वीटभट्टीवर अवैधरित्या विजेचा वापर केला जात असेल त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून मोटर पंप व वायर जप्त करून गुन्हा नोंदविण्यात यावा अशा सूचना तहसीलदारांनी तालुक्यातील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
वीटभट्टी चालकांना जामीन
दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले वीटभट्टी चालक सुरेश मलिये व स्वदीप मलिये यांना सोमवारी उशिरा रात्री हिंगणा पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर भादंविच्या कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विनोद नरवाडे करीत आहे.
---
सावंगी देवळी येथील घटना दुर्दैवी आहे. अशा प्रकारची घटना तालुक्यात पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलले जातील. तसेच मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यामार्फत तालुक्यातील संपूर्ण वीटभट्टीची तपासणी करून ज्या ठिकाणी मोठे खोल खड्डे आढळून येईल त्यांच्यावर कारवाई करून प्रशासनामार्फत ते खड्डे तातडीने बुजविले जाईल. ग्रामस्थांनीही प्रशासनाला याबाबत माहिती द्यावी.
- संतोष खांडरे
तहसीलदार हिंगणा
--
जेसीबीच्या साहाय्याने सावंगी देवळी येथील नाल्यातील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे.