दिनकर ठवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊनचा फटका कोराडी परिसरातील विटांच्या भट्ट्यांवर काम करणाऱ्या कामगारांनाही बसला आहे. सदर कामगार दुसऱ्या जिल्ह्यातून येथे उपजीविकेसाठी आले आहेत. सध्या त्यांचे काम गेल्याने मालकाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्याकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना शासनाकडून पुरेसे स्वस्त धान्य मिळण्याची शक्यताही मावळली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.कोराडी वीज केंद्राच्या मागच्या भागाला मोठ्या प्रमाणात विटांच्या भट्ट्या आहेत. शिवनी (मध्य प्रदेश), बालाघाट (मध्य प्रदेश), भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील कामगार त्या विटांच्या भट्ट्यांवर काम करीत असून, ते याच परिसरात कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर काही भट्ट्यांवरील काम बंद करण्यात आले तर काही भट्ट्यांवरील काम अजूनही सुरूच आहे. कामगारांनी मात्र त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण सोडले नाही. काम बंद झाल्यानंतर मालकांनी कामगारांना सुरुवातीला थोडीफार आर्थिक मदत केली. परंतु, लॉकडाऊनचा काळ वाढविण्यात आल्याने त्यानेही कामगारांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली.काम बंद असल्याने त्यांना मजुरी मिळत नाही. मालक अतिरिक्त पैसे द्यायला तयार नाही. शिधापत्रिका नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करणे शक्य नाही. खिशात पैसे नसताना किराणा दुकानातून महागडे धान्य व इतर जीवनावश्यक साहित्य खरेदी करणेही त्यांच्या आवाक्याबाहेर आहे.स्थानिक मतदारयाद्यांमध्ये नाव नसल्याने राजकीय नेतेही त्यांना मदत द्यायला तयार नाही. ही परिस्थिती कामगाराच्या एका कुटुंबाची नसून एकूण ८० कुटुंबाची आहे. येथे त्यांना खायला काही नाही तर प्रशासन त्यांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्यास परवानगी देत नाही. त्यामुळे त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली असून, भूकबळीची शक्यता नाकारता येत नाही.