कामठी (नागपूर) : कामठी-नागपूर मार्गालगतच्या राज लायन लॉनमध्ये शनिवारी (दि. २२) रात्री ७ वाजता विवाह साेहळ्याचे आयाेजन केले हाेते. दाेन्ही पक्षाकडील पाहुणे मंडळी व नातलग विवाहस्थळी पाेहाेचले हाेते. मात्र, ऐनवेळी नववधू तिच्या प्रियकरासाेबत पळून गेल्याने नवरदेवाला बाेहल्यावर चढण्यापूर्वीच नवरीविना परतीचा प्रवास करावा लागला.
कमाल चौक, नागपूर येथील २४ वर्षीय तरुणीचा विवाह भोपाळ (मध्य प्रदेश) येथील तरुणासोबत ठरला हाेता. दाेघांच्याही कुटुंबीयांनी एकत्र बसून २२ ऑक्टाेबर, रात्री ७ वाजता हा लग्नाचा मुहूर्त ठरवला. त्यामुळे वधूच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी राज लायन लॉन बूक केले आणि आप्तस्वकीयांसह मित्रांना निमंत्रण पत्रिका पाठविल्या. ठरल्याप्रमाणे दाेन्ही पक्षाकडील पाहुणे मंडळी विवाहस्थळी दाखल झाली. एवढेच नव्हे तर, मंडपात येण्यासाठी नवरदेवाच्या मिरवणुकीलाही सुरुवात करण्यात आली.
याच काळात नववधूचे मेकअप सुरू हाेते. दरम्यान, सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दाेन अनाेळखी तरुण चेहऱ्याला स्कार्फ बांधून विवाहस्थळी पाेहाेचले. ते थेट नववधूच्या मेकअप रूममध्ये गेले. त्यातील एकाने तू लग्न करते की माझ्यासाेबत चलते, असे म्हणत नववधूचा हात पकडला आणि तिच्या आई, मावशी व इतर नातेवाइकांसमाेर तिला घेऊन गेले. त्यावेळी या प्रकाराला कुणीही विराेध केला नाही. शिवाय, नववधू त्या तरुणासाेबत जाताना उत्साहित हाेती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
या प्रकारामुळे वर व वधू पक्षाच्या कुटुंबीय व नातेवाइकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. वराकडील मंडळींनी लगेच कामठी (नवीन) पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. वधूकडील मंडळींनी आपली फसवणूक केल्याचा आराेप त्यांनी तक्रारीत केला. दुसरीकडे, नववधूची आई व मावशीनेही पाेलिसात तक्रार दाखल करीत दाेन अनाेळखी तरुण तिला घेऊन गेल्याचे पाेलिसांना सांगितले. त्यातच पाेलिसांनी दाेन्ही पक्षांची बदनामी हाेईल म्हणून प्रकरण आपसात मिटवण्याची सूचना केली. मात्र, पाेलीस या प्रकरणात कुठलीही कारवाई करीत नसून, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आराेप केला आहे.