लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनेक वर्षांपर्यंत प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणारा नवरा मुलगा ऐन लग्नाच्या एक दिवसापूर्वीच प्रेयसीला धोका देऊन गायब झाला. रविवारी लग्नाच्या ठरलेल्या मुहूर्तावर लग्नमंडपात नवरदेव न पोहोचल्याने दुखावलेली नवरी परिवारासह सक्करदरा पोलीस ठाण्यात पोहोचली.फिर्यादी नवरी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार नवरा मुलगा लग्नासाठी तयार होता. परंतु त्याची आई आणि बहिणींचा विरोध होता. त्यामुळेच लग्न तुटण्याची वेळ आली. प्रवीण शिवचरण शामकुंवर (मुलगा), सुशीलाबाई शिवचरण शामकु वर (आई) आणि बहीण प्रणिता नितीन साळवे, अमिता बहादुरे, अनिता मेश्राम रा. भांडेप्लॉट, सेवादलनगर अशी आरोपींची नावे आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण एका फार्मा कंपनीत एमआर आहे. २७ वर्षीय युवती एका खासगी कंपनीत नोकरी करते. प्रवीण हा नात्यातच लागत असल्याने ते एकमेकांना ओळखतात. त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंधही निर्माण झाले. असा आरोप आहे की, गेल्या सहा वर्षांपासून प्रवीण लग्नाचे आमिष दाखवून युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. त्यांचे लग्न लांबणीवर पडत होते. आईनेही लग्नाला विरोध सुरू केला होता. अखेर रविवारी सकाळी १०.३० वाजता युवती व प्रवीणचे लग्न ठरले. मुलीच्या घरी लग्न होणार होते. शनिवारी रात्री १० वाजता हळद लावण्यासाठी प्रवीणला फोन करून बोलावण्यात आले. तेव्हा त्याने नकार दिला. थेट लग्नात पोहचेल असे सांगितले. परंतु तो आलाच नाही. अजनी येथील मुलीच्या घरी लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. रविवारी सकाळी १०.३० वाजता नातेवाईक आणि पाहुणेही पोहचले होते. परंतु नवरदेवाकडील कुणी आले नाही. प्रवीणचा मोबाईलही बंद येत होता. मुलीकडील काही नातेवाईक मुलाला आणण्यासाठी त्याच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी सांगितले की, प्रवीण रात्रीपासूनच गायब आहे. मुलीच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी अत्याचार, मारहाण आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.