वसीम कुरेशी
नागपूर : महाराजबाग रोडवर बांधला जाणारा जेमतेम ३० ते ४० मीटर लांबीचा पूल अद्यापही पर्ण झालेला नाही. खरे तर हा पूल दीड वर्षात पूर्ण करायचा होता. मात्र चार वर्षे होऊनही पुलाचे काम रेंगाळलेले आहे.
या पुलासंदर्भातील पुन्हा एक आश्चर्यकारक बाब पुढे आली आहे. या पुलाच्या प्रकल्पामध्ये झालेल्या सुधारणांची फाईल अद्यापही मनपाच्या धंतोली झोनकडे हस्तांतरित झालेली नाही. यामुळे पुलाच्या सुधारित आराखड्याच्या प्रस्तावाची सुधारित फाईल मंजूर झालेली नाही. सुधारित आराखड्यासोबतच सुमारे दीड कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चासह नवा प्रस्ताव मंजुरीसाठी तयार करण्यात आला आहे.
२०१८ मध्ये या पुलाच्या बांधकामाला ३ कोटी ५० ला रुपयांच्या खर्चाला मंजुरी होती. त्यानुसार कामही सुरू झाले होते. मात्र दूरदृष्टीच्या अभावामुळे भविष्यातील विचार झाला नव्हता. त्यामुळे पुन्हा नव्याने सुधारणा करून सुधारित आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. २०२० मध्ये लॉकडाऊनमुळे काम बंद पडले. जुन्या पुलावर एका बाजूने सेन्ट्रिंग लावून सळाखींचे जाळे करण्यात आले, मात्र यावर काँक्रिटिंग होऊ शकले नाही. त्यामुळे वर्षभरात सळाखी जंगल्या. सध्या एका बाजूचा पुल तयार झाला असून त्यावरून वाहतूकही सुरू झाली आहे. मात्र जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूंनी अगदी समोर दोन मोठाले वृक्ष येतात. सध्या एका खोल खड्ड्यामध्ये पाया भरण्याचे काम सुरू आहे. जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला नवा पूल तयार झाल्यावर जुना पूल तोडून नवा बांधला जाणार आहे. मात्र तो केव्हा तोडला जाणार हे नक्की नाही. जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेटिंग करण्यात आल्याने पूल अरंद झाला आहे. यावर बरेच खड्डे पडूनही ते बुजविण्यात आलेले नाहीत. यासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र त्यांनी उत्तरे देण्यात स्वारस्य दाखिवले नाही.