लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रामटेकनजीकच्या हिवरी-हिवरी मार्गातील पूल वाहून गेला. या भागात मंगळवारी (दि.१४) पाच तासांत ८५ मिमी पाऊस पडला. पावसामुळे पूल खचल्याने जि. प. बांधकाम विभागाने या मार्गावरील चारचाकी वाहतूक बंद केली आहे. केवळ दुचाकी वाहने ये-जा करीत आहेत. मागील वर्षी ९ सप्टेंबर २०२० ला अर्धा अधिक पूल खचला हाेता. त्यावेळी जि. प. बांधकाम विभागाने तात्पुरती दुरुस्ती केली हाेती, हे विशेष.
पूल वाहून गेल्याने मार्गावरील वाहतूक बंद झाली असून, या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन पुलाची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तीन वर्षांपूर्वी रामटेक ते हिवरा-हिवरी मार्गावरील नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याने अल्पवधीतच पुलाला भगदाड पडण्यास सुरुवात झाली. परंतु, संबंधित विभागाने त्याची दखल घेतली नाही. याबाबत ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले हाेते. मात्र, प्रशासन वा लाेकप्रतिनिधींनी त्याकडे लक्षच दिले नाही.
परिसरात १४ सप्टेंबरला जाेरदार पाऊस पडला. पाण्याच्या तेज प्रवाहामुळे अर्धाअधिक पूल एका बाजूच्या भिंतीसह वाहून गेला. या मार्गावर कन्हान, माैदा, नागपूर, तसेच परिसरातील गावात ये-जा करणाऱ्यांची वर्दळ सुरू असते. परंतु, हा पूल खचल्याने चारचाकी वाहतूक बंद झाली आहे. केवळ ३ किमी अंतरावरील रामटेकला चारचाकीने यायचे कसे, शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची कामे करायची कशी, असे प्रश्न उभे ठाकले आहे. याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता पाटील यांना विचारले असता, कार्यकारी अभियंत्यांची मंजुरी घेऊन पाऊस थांबल्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचे काम करावे लागेल. काम अधिक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सध्या चारचाकी वाहतूक बंद केली असून, या ठिकाणी नवीन पूल बांधावा लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.
या पुलाची तत्काळ दुरुस्ती करून जड वाहतूक बंद करावी, तसेच नवीन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी सरपंच रेखा मल्लेवार, माजी सरपंच दिलीप काठाेके, उपसरपंच विष्णू काठाेके, माधाे मल्लेवार, लाेकेश डहाके, अण्णाभाऊ चाफले, कमलाकर हिंगे, रमेश नाटकर यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे प्रशासन आता काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.