नागपूर : पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून यात काही अटींमध्ये सवलत देण्यात आली आहे. कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. मात्र खरी अडचण नंतर गॅस भरण्याची आहे. गॅसच्या किमती वाढल्याने त्या अल्प उत्पन्न कुटुंबांना परवडेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केंद्र सरकार कनेक्शन मोफत देत आहे, पण सिलिंडरची किंमत ९११.५० रुपयांवर पोहोचल्याने सिलिंडर कसा खरेदी करणार, असाही प्रश्न आहे. आर्थिक अडचणीमुळे उज्ज्वला पुन्हा चुलीवर येणार आहे.
कोरोनामुळे सर्वच गोष्टी महागल्या आहेत. रोजचा घरखर्च करणे आवाक्याबाहेर गेले आहे. एवढ्या महागाचा गॅस सिलिंडर घेऊन त्यावर शिजवण्यासाठी अन्नधान्य आणणे कठीण झाले असता गरिबाला गॅस कसा परवडेल, असा अनेक लाभार्थ्यांचा प्रश्न आहे. चूलमुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात गरीब लाभार्थ्यांना उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वाटप केले. या योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील १.६४ लाख लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. मात्र मागील दीड वर्षात गॅस सिलिंडरच्या किमती ९११ रुपयांवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर भरून घेणे अवघड झाले आहे. महागाईमुळे त्या पुन्हा चुलीकडे वळल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
मे २०१६ मध्ये ही योजना सुरू झाली व त्यानंतर एक-दोन वर्षांत सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यात यश आले. ही गॅस जोडणी दिल्यानंतर शासनाच्यावतीने सुरुवातीचे काही महिने लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडर दिले. त्यानंतर मोफत गॅस सिलिंडर बंद झाल्यानंतर ६० टक्के लाभार्थी केवळ पाहुणे आले किंवा घाईच्या वेळीच गॅसचा वापर करीत असल्याचे चित्र आहे.
आता सबसिडी केवळ ४० रुपयेच
पूर्वी गॅस सिलिंडरची किंमत वाढल्यानंतर त्या प्रमाणात सबसिडी मिळायची. पण आता सिलिंडरच्या किमती कितीही वाढल्या तरीही जवळपास १५ महिन्यांपासून ग्राहकांच्या खात्यात केवळ ४० रुपये सबसिडी जमा होत आहे. सरकार गॅस सिलिंडरची सबसिडी बंद करण्याच्या मार्गावर असल्याचे यावरून दिसून येते.
गॅस सिलिंडरचे दर (रुपयांत)
जानेवारी २०१९ - ७३८
जानेवारी २०२० - ७६०
जानेवारी २०२१ - ७४६
१ ऑगस्ट २०२१ - ८८६
१७ ऑगस्ट - ९११
सिलिंडर भरणे कसे परवडणार?
उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिले. सुरुवातीला गॅस सिलिंडरच्या किमती कमी होत्या त्यामुळे ते परवडत होते. पण मागील वर्षभरापासून गॅस सिलिंडरच्या किमती भरमसाट वाढल्याने त्याचा वापर आम्ही बंद केला आहे. सिलिंडर खरेदी करणे परवडत नाही. चुुलीवर स्वयंपाक करतो.
सत्यशीला देवरे, लाभार्थी.
केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत मोफत कनेक्शन व गॅस सिलिंडर मिळाल्याने आनंद झाला होता. चूल आणि धूर यापासून मुक्ती मिळणार असे वाटत होते. पण गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे मागील वर्षभरापासून आम्ही गॅसचा वापर करणेच बंद केले आहे. अनेक दिवसांपासून लाकडावर स्वयंपाक करीत आहे.
देवकी पारवे, लाभार्थी.
सरकारने मोफत गॅस कनेक्शन दिले, पण गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्याने सिलिंडर खरेदी करणे आमच्यासाठी कठीणच आहे. दर महिन्याला ९११ रुपयांचे सिलिंडर खरेदी करणे गरिबांना परवडणारे नाही. पाहुणे आल्यानंतरच गॅसवर स्वयंपाक करते. सरकारने अर्ध्या किमतीत सिलिंडर उपलब्ध करून द्यावा.
चिमणा मासुरकर, लाभार्थी.