नागपूर : रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. अनेक गरजू रुग्णांना उपचारादरम्यान रक्ताची गरज भासते; परंतु लागणाऱ्या रक्ताच्या तुलनेत रक्तदानाचे प्रमाण खूप कमी आहे. मात्र, असंख्य नागरिक आपली सामाजिक जबाबदारी पार पाडून नियमितपणे रक्तदान करतात. आर संदेश फाउंडेशनने ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत संदेश दवा बाजार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात ६४ वर्षांचे ब्रिजेश राछ यांनी सहभागी होत १०० व्या वेळी रक्तदान केले. गरजू रुग्णांना मदत व्हावी यासाठी आपण नियमित रक्तदान करीत असून, यापुढेही हे व्रत सुरूच राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
............
६२ व्या वर्षी विजयकुमार यांचे रक्तदान ()
नागपूर : कोरोनाकाळात अनेक रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासला. त्यामुळे विजयकुमार पलघणे यांना वाईट वाटले. ते संचालक लेखा (डाक) विभागातून ऑडिटर पदावरून निवृत्त झाले आहेत. नोकरी करीत असताना कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांना रक्तदान करता आले नाही; परंतु कोरोनाच्या काळात रक्ताची मागणी वाढल्यामुळे त्यांनी रक्तदान करण्याची खूणगाठ मनाशी बांधली. निसर्ग व पर्यावरण संस्था घोगलीच्या वतीने ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ते बेसाच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात पोहोचले आणि जीवनात पहिल्यांदा त्यांनी रक्तदान केले. यापुढेही नियमितपणे रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
..........