नागपूर : छोटी राज्ये म्हणजे चांगले प्रशासन, चांगल्या आरोग्य सेवेचे व्यवस्थापन. संसर्गजन्य रोगाने दाखविलेला हा मार्ग आहे. त्यामुळे केंद्र सरकारने विदर्भ राज्य निर्मितीच्या संदर्भात लवकरात लवकर पावले उचलावीत आणि येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात व राज्यसभेत विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विधेयक आणावे, अशी मागणी माजी आमदार आशिष देशमुख यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवेदनाद्वारे केली आहे. देशातील जवळपास १.७३ कोटी संसर्गित लोकांपैकी महाराष्ट्राचा आकडा ४५.३९ लाख आहे. छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड व तेलंगणा या नव्याने निर्माण झालेल्या राज्यांमध्ये सुमारे क्रमशः ७.१३ लाख, १.७४ लाख, २.२७ लाख व ४.३५ लाख प्रकरणे आढळून आली आहेत. इतर छोट्या राज्यांची आकडेवारीही इतर मोठ्या राज्यांपेक्षा कमी आहे. संक्रमणमुक्त होणे आणि मृत्यूची संख्या यातील प्रमाणसुद्धा हेच आहे. यासाठी अनेक कारणे असू शकतात. परंतु, त्यामागील प्रमुख कारण म्हणजे राज्याचा आकार होय.
मोठ्या राज्याच्या तुलनेत लहान राज्यांमध्ये आरोग्यासह सर्वच उपाययोजना व व्यवस्थापन करणे सोपे जाते. लवकरच मदत मिळते. हे सध्या कोरोनाच्या महामारीत दिसून येत आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य ही काळाची गरज असून, केंद्राने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.