लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना एक दिवस परत आणू, असा विश्वास माजी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया व सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अॅड. हरीश साळवे यांनी शनिवारी दत्तोपंत ठेंगडी व्याख्यानमालेत व्यक्त केला. ते लंडन येथून ऑनलाईन बोलले. अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्यावतीने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘आंतरराष्ट्रीय न्यायालयातील कुलभूषण जाधव प्रकरणाचे विश्लेषण व माझे अनुभव’ हा व्याख्यानाचा विषय होता. पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणात सुरुवातीपासूनच व्हिएन्ना कन्व्हेन्शन व मानवाधिकाराचे पालन केले नाही. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना हेरगिरी व दहशतवादी कारवायाच्या आरोपाखाली दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिल्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागून विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताचे मुद्दे उचलून धरून जाधव यांना हेरगिरी व दहशतवादी कारवायाच्या आरोपाखाली दोषी ठरविण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा व तेव्हापर्यंत फाशीची शिक्षा स्थगित ठेवण्याचा आदेश पाकिस्तानला दिला. तसेच, जाधव यांना भारत कायदेशीर मदत करेल असेही स्पष्ट केले. हा भारताचा मोठा विजय आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय लक्षात घेता पाकिस्तानने जाधव यांना आतापर्यंत मानवतेच्या आधारावर सोडायला हवे होते. यासाठी भारताने पाकिस्तानला पाच-सहा पत्रेही पाठवली आहेत. परंतु, पाकिस्तानमध्ये अहंकार ठासून भरला आहे. सध्या ते जाधव यांना सोडतील असे दिसत नाही. त्यामुळे आपण पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा विचार करीत आहोत असे अॅड. साळवे यांनी सांगितले.पाकिस्तानमधील न्यायालयाने भारतीय नागरिक सरबजितसिंग यांनाही फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, कारागृहातील एका बंदिवानाने प्राणघातक हल्ला केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याकडे एका प्रश्नाद्वारे अॅड. साळवे यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात असे होणार नाही असे मत व्यक्त केले. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालल्यामुळे त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. परिणामी, पाकिस्तान एवढा वाईट वागणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
जगाला भारतीय परंपरेची ओळख करून दिलीजाधव यांचे प्रकरण सुरू असताना पाकिस्तानचे वकील कुरैशी यांनी धमकी देणारे पत्र लिहिले होते. तसेच, न्यायालयातही भारतासंदर्भात आक्षेपार्ह शब्दांचा उपयोग केला होता. परंतु, आपण त्यांना अत्यंत संयमाने उत्तर दिले. आपण न्यायालयाचा आदर करतो व भारतीय परंपरा अशा पद्धतीने वागण्याची अनुमती देत नाही हे आपण जगाला दाखवनू दिले. प्रकरण संपल्यानंतर न्यायालयाच्या व्यवस्थापकांनी भारताच्या संयमी वागण्याची प्रशंसा केली, असे अॅड. साळवे यांनी अभिमानाने सांगितले.पाकिस्तानने अवैध पद्धतीने प्रकरण तयार केलेपाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याविरुद्ध अवैध पद्धतीने प्रकरण तयार केले हे जागोजागी दिसून येते. जाधव यांचा मोघम पद्धतीचा कबुलीजबाब तयार करण्यात आला. त्यात विशिष्ट प्रसंगाचा उल्लेख नव्हता. तारखा बरोबर नव्हत्या. यासह विविध त्रुटी होत्या. त्या आधारावर कबुलीजबाब निरर्थक ठरतो. त्यानंतर प्रकरणात काहीच वाचत नाही. जाधव यांच्याकडे बनावट पासपोर्ट होता हे मान्य केले तरी, त्यासाठी फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही. याशिवाय जाधव यांच्याविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखविण्यात आले आहेत. परंतु, त्याकरिता वेगवेगळे एफआयआर नोंदविण्यात आले नाही व स्वतंत्र खटले चालविण्यात आले नाही. भारताला जाधव यांच्या अटकेची माहिती खूप उशिरा देण्यात आली. त्यानंतर जाधव यांना कायदेशीर मदत करण्याची अनुमतीही देण्यात आली नाही. या सर्वांचे समाधानकारक उत्तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयात देता आले नाही, अशी माहिती अॅड. साळवे यांनी दिली.