आनंद शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रवासात प्रवाशांना तहान लागल्यानंतर ते प्लॅटफार्मवर उतरून नळाद्वारे बॉटलमध्ये पाणी भरतात. यामुळे अनेकदा धक्काबुक्कीचे प्रकार घडतात. परंतु आता नागपूर रेल्वेस्थानकावर या समस्येपासून दिलासा मिळाला आहे. प्लॅटफार्मवरील जागेची आणि नळाच्या देखभालीच्या खर्चात बचत करण्यासाठी ब्रिटिश पॅटर्नचे वॉटर स्टँड लावण्यात येत आहेत.रेल्वेस्थानकावर लावण्यात येत असलेले वॉटर स्टँड आकर्षक आहेत. त्यांचा आकार लहान असून त्याला चार नळ दिलेले आहेत. स्टँडसारखे असल्यामुळे त्यांना जागा कमी लागते. त्यामुळे प्रवाशांना प्लॅटफार्मवर ये-जा करण्यासाठी सुविधा होते. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेस्थानकाच्या सर्व प्लॅटफार्मवर २५ वॉटर स्टँडची गरज आहे. पहिल्या टप्प्यात १० वॉटर स्टँड लावण्यात येत आहेत. आतापर्यंत ८ स्टँड लावण्यात आले आहेत. उर्वरीत १२ स्टँड लवकरच लावण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील सर्वच रेल्वेस्थानकावर अशा १०० वॉटर स्टँडची आवश्यकता आहे.काय आहे ब्रिटिश पॅटर्न ?रेल्वेस्थानकावरील वॉटर स्टँड ब्रिटिश पॅटर्नवर आधारित आहेत. त्यामुळे हे ब्रिटिश पॅटर्न काय आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. इंग्रजांच्या काळात रेल्वेस्थानकावर असेच वॉटर स्टँड लावण्यात येत होते. हे वॉटर स्टँड स्टेनलेस स्टील ऐवजी दगडापासून तयार केलेले असायचे. इंग्लंडमध्येही या पद्धतीचे स्टँड पाहावयास मिळतात. हे स्टँड सोयीचे असतात.स्टेनलेस स्टीलपासून तयार झाले आहेत वॉटर स्टँडरेल्वेस्थानकावर लावण्यात येत असलेले वॉटर स्टँड स्टेनलेस स्टीलपासून तयार करण्यात आले आहेत. त्याचा खर्च जवळपास ४० हजार आहे. या स्टँडमधून पाणी गळणार नाही अशा पद्धतीने ते बनविण्यात आले आहेत. यात मोठी जाळी असल्यामुळे त्यात कचरा जमा होतो. त्यामुळे वॉटर स्टँड साफ करण्यासाठी आणि देखभालीसाठी सोयीचे होते. काचीगुडा स्टेशनवर या प्रकारचे वॉटर स्टँड लावण्यात आले आहेत. त्या धर्तीवर नागपूर रेल्वेस्थानकावर हे वॉटर स्टँड लावण्यात येत आहेत.
नागपूर रेल्वेस्थानकावर ब्रिटिश पॅटर्नचे वॉटर स्टँड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 11:14 AM