लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रो अजनी स्टेशनवरून भारतीय रेल्वेच्या वेळेनुसार ब्रॉडगेज रुळावरून रेल्वे चालविणार आहे. या प्रकल्पासाठी महामेट्रोला भारतीय रेल्वेकडून मंजुरी मिळाली असून दीड वर्षात मेट्रो रेल्वे प्रत्यक्षरीत्या ब्रॉडगेजवरून धावणार आहे. या अंतर्गत चार कॉरिडोरवर २६८.६३ किमी राहणार आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानंतर फेऱ्या वाढल्यानंतर अंतरही वाढणार आहे. याकरिता मेट्रोचा अंदाजे खर्च ३०५.१८ कोटी रुपये असणार आहे. या अंतर्गत खासगी गुंतवणूकदारांना सहभागी करून घेण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे.
ब्रॉडगेजवर मेट्रो धावण्याचा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. याचे अनुकरण संपूर्ण देशात करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर तीन डब्याँच्या दहा मेट्रो रेल्वे धावणार आहेत. प्रवासी वाढल्यानंतर मेट्रो रेल्वेची संख्या ३० वर नेणार आहे. त्यानंतर डब्यांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव आहे.
या प्रकल्पासाठी महामेट्रोला मेट्रो रेल्वे खरेदी करणे शक्य नसल्याने प्रकल्पात खासगी ऑपरेटर्सचा सहभाग असावा, असा प्रयत्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आहे. याकरिता त्यांनी रविवारी खासगी गुंतवणूकदारांची बैठक घेतली होती. त्यात काहींनी मेट्रो खरेदी करून ब्रॉडगेजवर चालविण्याची तयारी दर्शविली होती. यामध्ये तिकिटांमधून महामेट्रो आणि भारतीय रेल्वेला काही हिस्सा द्यायचा आहे. सर्वांगीण विचार करून हा प्रकल्प कसा सक्षम होईल, यावर विचार करण्यात येत आहे.
अंदाजे ३०५.१८ कोटींच्या खर्चात रोलिंग स्टॉकचा खर्च १३८ कोटी, डेपोच्या पायाभूत सुविधांसाठी ७८१.०७ कोटी, इंटिग्रेटेड तिकिटिंग सिस्टिमसाठी ७.२४ कोटी, स्टेशन अपग्रेडेशनसाठी ४८.०३ कोटी, जनरल चार्जेजसाठी १६.५० कोटी आणि आकस्मिकताकरिता १२.७५ कोटी अशी एकूण तरतूद केली आहे.
ब्रॉडगेज मेट्रोसाठी अजनी स्टेशन हे मध्यवर्ती ठिकाण राहणार आहे. या स्टेशनवरून वर्धा अंतर ७८.८ किमी व १२ स्टेशन, नरखेड अंतर ८५.५३ किमी व ११ स्टेशन, रामटेक अंतर ४१.६ किमी व ८ स्टेशन आणि भंडारा रोड अंतर ६१.७ किमी व ११ स्टेशन असे ब्रॉडगेज मेट्राेचे स्वरूप राहणार आहे.