आनंद शर्मा
नागपूर : अखेर चार वर्षांनंतर ब्रॉडगेज मेट्रोचा मसुदा तयार झाला असून मंजुरीसाठी महामेट्रोने १५ दिवसांपूर्वी रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. या मसुद्यावर जुलै अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. या मेट्रोसाठी ‘वंदे भारत’चे कोच वापरले जाणार आहेत. ब्रॉडगेज मेट्रोमुळे रेल्वेला पाचपट उत्पन्न मिळणार आहे.
वंदे भारत रेल्वेच्या कोचची नियमित निर्मिती सुरू झाली आहे. ब्रॉडगेज मेट्रो चालविण्यासाठी रेल्चे बोर्डातर्फे वंदे भारत कोचचे डिझाईन महामेट्रोला सोपविण्यात आले आहे. कोचचा पुरवठा केव्हा आणि कसा होईल, यावर निर्णय होणार आहे. करारानुसार महामेट्रो भारतीय रेल्वेला जास्त दरावर ब्रॉडगेज मेट्रो चालविण्यासाठी देणार आहे. त्यातून भारतीय रेल्वेला प्रति किमी ४० पैशांऐवजी आता दीड ते दोन रुपये म्हणजे चार ते पाचपट रक्कम मिळणार आहे.
ब्रॉडगेज मेट्रोशी संबंधित सर्व कामे भारतीय रेल्वे करणार आहे. रेल्वे, ट्रॅक, सिग्नल, संचालन सर्वकाही राहील. महामेट्रो टिकट कलेक्शन, जाहिरात, महसूल आदी कामे पाहणार आहे.
- तत्कालिन रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत १६ जुलै २०१८ ला ब्रॉडगेज मेट्रो रेवे प्रकल्पाबाबत रेल्वे, महामेट्रो आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार झाला होता.
- नागपुरातून वर्धा, नरखेड, रामटेक आणि भंडारापर्यंत अत्याधुनिक ब्रॉडगेज मेट्रो धावणार आहे. ४१८ कोटींचा प्रकल्पाचा डीपीआर अर्बन मास ट्रान्झिट कंपनीने तयार केला आहे.