मोरेश्वर मानापुरे
नागपूर : एरवी मेट्रो हे नावदेखील समोर आले, तर बहुराष्ट्रीय कंपन्यांचेच नाव डोळ्यासमोर येते. मात्र नागपूरला विदर्भातील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडण्यासाठी प्रस्तावित ब्रॉडगेज मेट्रोला चालविण्याची तयारी स्थानिक उद्योजकांनी दाखविली आहे. अनेकांनी त्यादृ्ष्टीने पुढाकार घेतला असून त्यातून मेट्रोला बळ मिळणार आहे व रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
नागपूरला विदर्भातील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडण्यासाठी महत्त्वाकांक्षी ब्रॉडगेज प्रकल्प राबविण्याची तयारी सुरू झाली आहे. या प्रकल्पासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज रुळावर मेट्रो चालविण्याचा प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून पुढे आला. गडकरी यांच्या पुढाकाराने भारतीय रेल्वे, महाराष्ट्र शासन आणि महामेट्रोमध्ये नोव्हेंबर २०२० मध्ये करार करण्यात आला. या प्रकल्पाला चालना देण्यासाठी स्थानिक उद्योजकांनी पुढे यावे व ब्रॉडगेज मेट्रो चालवावी, असे आवाहन गडकरी यांनीदेखील केले होते. प्रकल्पाचे संचालन खासगी तत्त्वावर करण्यात येणार असल्याने गुंतवणुकीसाठी अनेक उद्योजक पुढे आले आहेत. आत्मनिर्भर भारतअंतर्गत भारतीय वॅगन उत्पादक कंपनी टीटागड वॅगन्स लिमिटेडचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उमेश चौधरी यांनी वर्धा कॉरिडोसाठी ३६ कोटी किमतीची ट्रेन ३० कोटी रुपयात देण्याची तयारी दाखविली आहे. यासंदर्भातील पत्र त्यांनी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी यांना पाठविले आहे.
उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष समिती
प्रकल्पात जास्तीत जास्त उद्योजकांनी गुंतवणूक करावी, या उद्देशाने विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी यांच्या अध्यक्षतेखाली मोबिलिटी समिती तयार करण्यात आली. समिती आणि मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत आतापर्यंत पाचवेळा बैठक घेण्यात आली आहे. ब्रॉडगेज मेट्रोचे संचालन करताना उद्योजकांना कुठे आणि कशी गुंतवणूक करायची, या प्रकल्पातून त्यांना कसा परतावा मिळेल, प्रवाशांना होणारा फायदा आणि विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. समितीची बैठक पुढील महिन्यात होणार आहे.
काय आहे प्रस्ताव...
भारतीय रेल्वेच्या अजनी स्टेशनवरून नागपूरच्या चहुबाजूला ७५४ कि.मी. लांबीच्या ब्रॉडगेज मार्गावर मेट्रो धावणार आहे. प्रकल्पाचे दोन टप्पे असणार असून पहिल्या टप्प्यात अजनी स्टेशनवरून वर्धा (७८.८ कि.मी.), भंडारा रोड (५९.२ कि.मी.), रामटेक (४१.६ कि.मी.) , नरखेड (८५.५ कि.मी.) या मार्गावर ब्रॉडगेज मेट्रो धावणार आहे. या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी २६५.१ किलोमीटर राहणार आहे. प्रकल्पासाठी ४०८ कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून यात ४२ स्थानके राहणार आहेत. या प्रकल्पाच्या डीपीआरला केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्येच मान्यता दिली असून, केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता मिळण्याची औपचारिकता राहिली आहे. मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाला गती मिळणार आहे.
वाहतूक कोंडीवर ठरेल पर्याय
पुढील काही वर्षांत नागपुरात वाहतुकीची समस्या भीषण होणार आहे. यावर गांभीर्याने विचार करून प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. भारताचे भौगोलिक केंद्र असलेले नागपूर शैक्षणिक आणि औद्योगिक हब असल्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. रोजगाराला गती देणाऱ्या या प्रकल्पामुळे विदर्भच नव्हे, तर मध्य भारताचा विकास होणार आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांचा प्रवास आणि वाहतुकीच्या कोंडीवर उपाय म्हणून हा प्रकल्प सर्वोत्तम पर्याय ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
(उद्याच्या अंकात : प्रकल्पाचा प्रवाशांना काय फायदा होणार)