नागपूर : न्यू मनीषनगर येथे दिवसाढवळ्या घरात घुसून एका महिलेला चाकूच्या धाक दाखवून दीड लाखाचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
गोविंद राज हे मार्केटिंगचे काम करतात. कुटुंबात पत्नी योगिता आणि आई-वडील आहेत. वडील रिझर्व्ह बँकेतून तर आई एसबीआयमधून सेवानिवृत्त झाली आहे. गोविंद हे कामावर गेल्यानंतर घरी आई-वडील आणि पत्नी होत्या. दुपारी ३ वाजेच्या सुमारास योगिता बेडरूममध्ये झाेपल्या होत्या. गोविंदचे आई-वडील पेंशनर असल्याने दुपारी २.३० वाजता सोमलवाडा येथील बँकेत कामानिमित्त गेले होते. जाताना योगिताला उठवण्याऐवजी बाहेरूनच दरवाजा लावला. दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास दोन युवक घरात घुसले. बेडरूममध्ये गेल्यावर त्यांना योगिता दिसली. त्यांनी योगिताला उठवले आणि तिच्या गळ्याला चाकू लावला. आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. योगिता घाबरून शांत बसली.
आरोपींनी योगिताच्या गळ्यातील मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्या काढून घेतल्या. घरातील किमती वस्तू शोधू लागले. त्यांना पूजेच्या ठिकाणी चांदीची समई मिळाली. ते घेऊन ते फरार झाले. जाताना त्यांनी घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. सासू-सासरे घरात नसल्याचे पाहून योगिताने पतीला फोन केला. त्यांना आई-वडिलांना फोन करून विचारले असता ते बँकेत असल्याचे समजले. मुलाने घडलेला प्रकार सांगताच दोघेही घरी आले. त्यानंतर बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी लगेच कारवाई सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.