नागपूर : मालमत्ता कर कमी करण्यासाठी फूटपाथवरील एका विक्रेत्याकडून लाच घेणाऱ्या मनपातील एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. महापालिकेच्या आसीनगर झोनमध्ये ही कारवाई झाली. सत्येंद्र सुरेश भराडे (३६, मानकापूर) असे आरोपीचे नाव असून तो मानकापूर येथील रहिवासी आहे. या कारवाईमुळे पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सत्येंद्र हा महापालिकेच्या आसीनगर झोनमध्ये दलाल आहे. तो स्वतःला कारकून म्हणवतो. तक्रारदार फूटपाथवर हेल्मेट विकतो. २०१७ मध्ये त्यांनी आसीनगर झोन अंतर्गत घर खरेदी केले होते. त्या घरावर सुमारे ४३ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकीत होता. तक्रारदार हा कर भरण्यास असमर्थ असल्याने कर कमी करण्यासाठी त्याने आसीनगर झोनच्या कर निरीक्षकाशी संपर्क साधला. कर निरीक्षकाने त्याला सत्येंद्रशी बोलायला सांगितले.
कामाच्या बदल्यात सत्येंद्रने १५ हजार रुपये मागितले. ही रक्कम देण्यास तक्रारदाराने असमर्थता व्यक्त केली. पैशाशिवाय काम होऊ शकत नाही असे दलालाने सांगितल्यावर तक्रारदाराने पत्नीचे दागिने विकून पैशाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही तो १५ हजार रुपये जमा करू शकला नाही. त्याने १४ हजार देण्याची तयारी दाखविली. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्याने ‘एसीबी’शी संपर्क साधला. त्याच्या तक्रारीची चाचपणी केल्यावर ‘एसीबी’च्या पथकाने सापळा रचला. त्याआधारे बुधवारी आसीनगर झोनमध्ये सत्येंद्रला १४ हजार रुपये घेताना पकडले.
सर्वच झोनमध्ये वाढले दलाल
या प्रकरणात कर निरीक्षकाचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. एसीबीने त्याची चौकशीही केली आहे. सत्येंद्र यांचा महापालिकेशी काहीही संबंध नाही. असे असतानाही तो दिवसभर आसीनगर झोनमध्ये सक्रिय असतो. महापालिकेच्या सर्वच झोनमध्ये हीच स्थिती आहे. अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त मधुकर गीते, उपअधीक्षक संदीप जगताप, निरीक्षक युनूस शेख, शिवशंकर खेडेकर, सचिन मत्ते, काळमेघ, महेश सेलोकर, सचिन किन्हे, शारिक अहमद यांनी केली.
सावनेर येथील लाचखोर लिपिक ‘एसीबी’च्या जाळ्यात
सावनेर तहसील कार्यालयातील निवडणूक विभागातील कनिष्ठ लिपिक अमोल देशपांडे (४४) याला ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुधवारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. सावनेर तालुक्यातील कोथूळना येथील तक्रारकर्ता आणि त्याच्या आईवडिलांचा शेजाऱ्यांसोबत वाद झाला होता. या तक्रारीवरून खापा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कलम १०७, ११६(३), १५१(१) सीआरपीसी नुसार प्रतिबंधक कारवाईसाठी नोटीस बजावला होता.
तहसील कार्यालयातून हे प्रकरण निकाली काढण्यासाठी कारकून अमोल देशपांडे यांनी साडेचार हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ३ हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर सापळा रचून लाच स्वीकारताना अमोल देशपांडे याला अटक करण्यात आली. याप्रकरणी त्याला रामटेक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.