नागपूर : इतवारीसह पूर्व नागपुरातील तेल व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या चंद्रेश कमवानी या दलालाला लकडगंज पोलिसांनी अखेर अटक केली आहे. अगोदर गुन्हा दाखल करण्यास विलंब व त्यानंतर त्याला अटक करण्यात दाखविण्यात आलेल्या उदासीनतेमुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
चंद्रेश इतवारीत तेलाची दलाली करतो. जगनकुमार केवलरामानी यांच्यासह अनेक व्यावसायिकांना त्याने गंडा घातला. तो मोठ्या व्यापाऱ्यांकडून तेल खरेदी करून छोट्या किंवा चिल्लर व्यापाऱ्यांना विकायचा. छोट्या व चिल्लर व्यापाऱ्यांकडून वसूल केलेली रक्कम मोठ्या व्यापाऱ्यांना देण्यात दहा ते बारा दिवसांचा फरक पडायचा. चंद्रेशने निर्धारित वेळ होऊनही व्यापाऱ्यांना पैसे दिले नाहीत. अनेक व्यापाऱ्यांकडून त्याने क्रेडिटवर तेल खरेदी केले. हा प्रकार केवलरामानी यांना कळताच त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरुवातीला व्यावसायिक व्यवहार आणि दिवाणी प्रकरणामुळे गुन्हा नोंदविण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. तक्रार करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढल्याने २५ मार्च रोजी लकडगंज पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आठवडाभरापासून व्यापारी चंद्रेशच्या अटकेच्या प्रतीक्षेत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अखेर त्याला अटक करण्यात आली. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.