------
नागपुरातील धक्कादायक प्रकार-उपासमार टाळण्यासाठी सरकारने दिले होते सानुग्रह अनुदान
मंगेश व्यवहारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारी अनुदान लाटण्यासाठी कळस गाठण्याचा प्रकार नागपुरात पुढे आला आहे. कोरोना महामारीच्या काळात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची उपासमार होऊ नये म्हणून सरकारने सानुग्रह अनुदान दिले होते. दलालांनी हे अनुदान लाटण्यासाठी या व्यवसायात नसलेल्या परिचित सामान्य महिलांची नावे यादीत घुसविली. हा गंभीर प्रकार सामान्य महिलांच्या लक्षात आल्याने, या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे.
शासकीय अनुदानासाठी फसवणुकीचे अनेक प्रकार यापूर्वीही उजेडात आले आहेत. पण हा प्रकार सामान्य महिलांसाठी बदनामीकारक असल्याने भीतीपोटी कुणीही याची तक्रार विभागाकडे अथवा पोलिसात केलेली नाही. कोरोनाची पहिली लाट रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लावले. त्याचा परिणाम अनेकांचे रोजगार बुडाले. त्याचा परिणाम देहविक्रय करणाऱ्या महिलांवरही झाला. न्यायालयाने याची दखल घेऊन शासनाला त्यांची मदत करण्याचे आदेश दिले. सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागाने देहविक्रीच्या व्यवसायात असलेल्या महिलांसाठी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या तीन महिन्याच्या कालावधीसाठी १५ हजार रुपये व त्यांना १८ वर्षांखालील मूल असेल तर ७,५०० रुपये अनुदान देण्यात आले. त्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाने जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक यांच्या माध्यमातून वेश्याव्यवसायात काम करणाऱ्या महिलांचे अर्ज मागविले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाने या क्षेत्रात काम करणाऱ्या काही संस्थांना हे काम दिले होते.
असे फुटले बिंग
शासकीय अनुदान लाटण्यासाठी दलालांनी या व्यवसायात नसलेल्या सामान्य घरातील आपल्याच परिचितांना खोटी माहिती देऊन त्यांच्याकडून कागदपत्र गोळा केले. अनुदान मिळाल्यानंतर ५० टक्के रक्कम दलालाने मागितली. संबंधित महिलेच्या खात्यात अनुदान जमा झाल्यानंतर दलालाने महिलेकडून ७५ टक्के रक्कम मागितली. महिलेने ही रक्कम देण्यास नकार दिला व अनुदानासंदर्भात माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांना धक्काच बसला. पण हे प्रकरण बदनामी करणारे असल्याने या प्रकरणात महिलांनी चुप्पी साधली.
या भागात घडलेत प्रकार
शहरातील बाबुळखेडा, नंदनवन, शंभूनगर, मंगलमूर्तीनगर, धम्मदीपनगर या भागातील सामान्य घरातील महिलांसोबत हा प्रकार घडला आहे. पण कुणीही या प्रकरणात पुढे आलेले नाही.
- २,७०५ महिलांची यादी विभागाकडे
महिला व बाल विकास विभागाने जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथकाकडून अशा महिलांची यादी मागितली. या पथकाने २,७०५ महिलांची यादी विभागाकडे पाठविली. विभागाने बँकेकडे ती यादी पाठविली. यातील १५ महिलांनी दिलेल्या माहितीत बँकेला त्रुटी आढळल्याने निधी जमा केला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, व्यवसायात सक्रिय असलेल्या १४०० च्या जवळपास महिला जिल्ह्यात आहेत.
- शासनाने दिलेल्या निर्देशानुसार व एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाकडून आलेल्या यादीनुसार आम्ही कार्यवाही केली आहे.
अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, नागपूर
- नागपूर जिल्ह्यात असा कुठलाही प्रकार झालेला नाही. ज्या महिलांची यादी आम्ही महिला व बाल कल्याण विभागाकडे पाठविली आहे, त्या प्रत्येक महिलेची नोंद आमच्याकडे आहे. ज्या महिलांची फसवणूक झाली, त्यांना तुम्ही आमच्याकडे घेऊन या.
- फाले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक
- यापूर्वी काही जिल्ह्यांमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यासंदर्भात कारवाई करून संबंधित संस्थेला आम्ही ब्लॅकलिस्ट केले आहे. यासंदर्भात नागपुरातूनही तक्रारी आल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संस्थेवर कारवाई करू.
यशोमती ठाकूर, महिला व बाल कल्याण मंत्री