नागपूर : ठेक्याने दिलेल्या शेतीच्या पैशावरून आई व मुलामध्ये भांडणे व्हायची. या वादात मुलगी आईची बाजू घ्यायची. आई व मुलाचे भांडण सुरू असताना मुलीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यातच तिने भावाला विटेचा तुकडा फेकून मारला. त्यामुळे चिडलेल्या भावाने पती, दाेन्ही मुले व आईसमाेर बांबूच्या दांड्याने बहिणीच्या डाेक्यावर वार केले. तिला उपचाराला नेताना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माेहपा येथे साेमवारी (दि. ३) सकाळी घडली असून, पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदवित आराेपी भावाला अटक केली.
उज्ज्वला अर्पित भाेजने (३२, रा. धनगाैरी नगर, ढग्याच्या बंगल्यासमाेर, पिपळा राेड, नागपूर) असे मृत बहिणीचे तर शरद विठाेबा गणाेरकर (३०, रा. गळबर्डी, माेहपा, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी भावाचे नाव आहे. उज्ज्वला, पती अर्पित, तिची जुळी मुले विराट व वेदांत शुक्रवारी (दि. ३१) माेहपा येथे आईकडे आले हाेते.
साेमवारी सकाळी शरदने आईला बाहेर बाेलावून तिच्याशी भांडायला सुरुवात केली. त्यावेळी उज्ज्वला, तिचे पती व दाेन्ही मुले घरीच हाेती. या भांडणात उज्ज्वलाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यातच तिने फेकून मारलेला विटाचा तुकडा शरदच्या चेहऱ्याला लागला. त्यामुळे त्याने बांबूच्या दांड्याने सर्वांसमक्ष उज्ज्वलाच्या डाेक्यावर वार केले.यात गंभीर जखमी झाल्याने तिला लगेच माेहपा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले. प्रथमाेपचार केल्यानंतर तिला सावनेर येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घाेषित केले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी शरदला अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक प्रवीण मुंढे करीत आहेत.