मृत बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी भाऊ हायकोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:42 PM2018-09-14T22:42:23+5:302018-09-14T22:43:24+5:30
मृत बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी भावाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. बहिणीचा तिच्या प्रियकराने खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी महत्त्वाचा पुरावा असलेले एक रजिस्टर हरवल्यामुळे खटला आरोपीच्या बाजूने झुकला आहे. या प्रकरणाचा सीबीआय किंवा अन्य सक्षम संस्थेमार्फत तपास करण्यात यावा असे भावाचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मृत बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी भावाने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. बहिणीचा तिच्या प्रियकराने खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी महत्त्वाचा पुरावा असलेले एक रजिस्टर हरवल्यामुळे खटला आरोपीच्या बाजूने झुकला आहे. या प्रकरणाचा सीबीआय किंवा अन्य सक्षम संस्थेमार्फत तपास करण्यात यावा असे भावाचे म्हणणे आहे.
राजेश भवनानी असे भावाचे नाव असून तो मूर्तिजापूर, जि. अकोला येथील रहिवासी आहे. त्याच्या बहिणीचे नाव कविता होते. आरोपीचे नाव अंकुश बन आहे. २०१० मध्ये शेगाव, जि. बुलडाणा येथील एका हॉटेलमध्ये कविताचा मृतदेह आढळून आला होता. आरोपी अंकुशला कवितासोबत लग्न करायचे नव्हते. त्यामुळे त्याने तिचा खून केला अशी तक्रार आहे. हॉटेलमधील खोली भाड्याने घेताना अंकुशने रजिस्टरवर खोटे नाव लिहिले असे तपासात आढळून आले. त्यामुळे ते रजिस्टर हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवून अहवाल मागविण्यात आला होता. यासंदर्भातील खटला खामगाव सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. सरकारी वकिलाने सत्र न्यायालयात सादर करण्यासाठी पोलिसांना हॉटेलचे रजिस्टर मागितले होते. परंतु, पोलिसांना रजिस्टर सादर करण्यात अपयश आले. रजिस्टर कुठे गेले कुणालाच माहिती नाही. दरम्यान, सरकारचे काही महत्त्वाचे साक्षीदारही फितूर झाले. या बाबी लक्षात घेता पोलीस व आरोपींनी गुन्हा सिद्ध होऊ नये यासाठी संगनमत केल्याचे स्पष्ट होते असे भवनानी यांचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयाने राज्याच्या गृह विभागाचे सचिव, बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक व शेगाव पोलिसांना नोटीस बजावून यावर १० आॅक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. तसेच, तेव्हापर्यंत सत्र न्यायालयातील खटल्यावर स्थगिती दिली. भवनानी यांच्यातर्फे अॅड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली.