लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या विधानसभा निवडणुकीपासून देशमुख कुटुंबात पडलेली दरी मिटण्याची चिन्हे नाहीत. भाजपाचे आ. आशिष देशमुख यांनी भाजपा नेत्यांच्या कार्यशैलीवर उघडपणे वार करणे सुरू केले असताना त्यांचे चुलतभाऊ राष्ट्रवादीचे युवा नेते सलील देशमुख यांनी त्यांच्या बोडअळीच्या शासकीय मदतीवरून लक्ष्य केले आहे. आशिष देशमुख यांच्या दुर्लक्षामुळेच काटोल - नरखेड तालुका बोंडअळी पॅकेजमधून वगळण्यात आला, असा आरोप सलील यांनी केली आहे. या प्रकारामुळे देशमुखांमधील भाऊबंदकी पुन्हा एकदा उफाळल्याचे चित्र आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख यांनी भाजपाचे तिकीट घेत स्वत:चे काका व राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांना पराभूत केले होते. तेव्हापासून या देशमुख कुटुंबात वेबनाव निर्माण झाला होता. मात्र, असे असले तरी निवडणुकीनंतरही एकमेकांवर उघडपणे दोषारोप करणे दोन्ही बाजूंनी टाळले जात होते. आता मात्र, सलील देशमुख यांनी थेट आ. आशिष यांच्यावर नेम साधत आव्हान दिले आहे. सलील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आत्मबळ यात्रा करणारे काटोलचे आमदार आशिष देशमुख यांना स्वत:च्या मतदार संघाचाच विसर पडला आहे. येथील सर्व समस्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केले असून जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या बोंडअळीच्या पॅकेजमधून काटोल व नरखेड तालुक्याला वगळण्यात आले आहे. शासकीय सर्वेक्षण होत असताना आमदार म्हणून याकडे लक्ष देण्याची गजर होती. मात्र, आशिष यांनी संपूर्ण दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. त्यांचा हा नाकर्तेपणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला असल्याची बोचरी टीकाही सलील यांनी केली आहे.आ. आशिष देशमुख यांनी मतदारसंघातील समस्यांचा अभ्यास करुन आवाज उठविणे अपेक्षित आहे. परंतु त्यांनी जनतेलाच वाऱ्यावर सोडले आहे. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. ज्यावेळी कर्जमाफीची घोषणा केली तेव्हा त्यांनीच मतदारसंघात ९० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला, असे बॅनर लावले होते. ही कर्जमाफी माझ्यामुळेच झाली असे दाखवित स्वत:चा सत्कार करून घेतला होता. आता कोणत्या शेतकऱ्यांचा साताबारा कोरा झाला, हे त्यांनी सांगावे. काटोल व नरखेड तालुक्यातील शेतकरी तूर खरेदी कधी होणार याची वाट पाहत आहे. मागील वर्षी त्यांनी नरखेड येथे तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन केले होते, तेच केंद्र चार दिवसात बंद पडले होते, ते परत सुरू करण्यासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केले नाही. केवळ पोस्टरबाजी करुन मतदारसंघाचा विकास झाल्याचे दाखविण्याचे त्यांचे काम सुरू असल्याचा आरोप सुध्दा सलील देशमुख यांनी केला. विदर्भाच्या मागणीसोबत आपल्या मतदारसंघाकडेही लक्ष द्या, असा टोलाही सलील यांनी लगावला आहे.
देशमुखांमधील भाऊबंदकी उफाळली : सलील यांनी साधला आशिष यांच्यावर नेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 8:29 PM
गेल्या विधानसभा निवडणुकीपासून देशमुख कुटुंबात पडलेली दरी मिटण्याची चिन्हे नाहीत. भाजपाचे आ. आशिष देशमुख यांनी भाजपा नेत्यांच्या कार्यशैलीवर उघडपणे वार करणे सुरू केले असताना त्यांचे चुलतभाऊ राष्ट्रवादीचे युवा नेते सलील देशमुख यांनी त्यांच्या बोडअळीच्या शासकीय मदतीवरून लक्ष्य केले आहे.
ठळक मुद्देनागपुरातील काटोल - नरखेड तालुका बोंड अळी पॅकेजमधून वगळला