नागपूर : मागील २४ तासांत शहरातील विविध भागांत झालेल्या रस्ते अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. वाडी, सदर व हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात झाले.
रविवारी सायंकाळी बहिणीला घरी सोडायला जाणाऱ्या भावाच्या दुचाकीला पिकअप वाहनाने धडक दिली व त्यात बहिणीचा मृत्यू झाला. निशा गणेश हिरणवार (४२, भोले पेट्रोलपंपामागे, गवळीपुरा) असे मृतक महिलेचे नाव आहे. त्या विपीन भारत सिरीया (३८, सदर) या त्यांच्या भावाच्या दुचाकीवर बसून घरी जात होत्या. आदित्य अजय तभाने (२०, नारी) या चालकाने वेगाने पिकअप गाडी चालवत, विपीनच्या दुचाकीला मागून धडक दिली. यात भाऊबहीण दुचाकीवरून खाली पडले व दोघेही जखमी झाले. उपचारासाठी निशा यांना एका खासगी इस्पितळात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोन तासांतच त्यांचा मृत्यू झाला. विपीनवर अद्यापही उपचार सुरू आहेत. विपीनच्या तक्रारीवरून आदित्य तभानेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर पोलिस ठाण्यातील पथकाने त्याला अटक केली आहे.
भरधाव टँकरने घेतला वृद्धाचा बळी
नेहमी वर्दळ असलेल्या रिंग रोडवरील उदयनगर चौकात भरधाव टँकरच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. कैलास भदुजी चवारे (६५, विठ्ठलनगर) असे मृताचे नाव आहे. रविवारी ते त्यांचे मित्र रामेश्वर देवतळे यांच्यासह दुचाकीवर जात होते. दुचाकी चवारे हेच चालवत होते. म्हाळगीनगर चौकाकडून एम.एच.०४-एफपी ७२०४ या क्रमांकाचा टॅंकर भरधाव वेगाने आला व चवारे यांच्या दुचाकीला धडक दिली. टॅंकरचा वेग जास्त असल्याने, चवारे हे काही अंतरावर अक्षरश: फरपटत गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. देवतळे हेही जखमी झाले. घटनास्थळावरील नागरिकांनी दोघांनाही मेडिकल इस्पितळात नेले. डॉक्टरांनी चवारे यांना मृत घोषित केले, तर देवतळे यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी टॅंकर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.
गिट्टीच्या ढिगाऱ्यावर मोटारसायकल चढल्याने मृत्यू
गिट्टीच्या ढिगाऱ्यावर मोटारसायकल चढल्याने जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सुरेंद्र आत्माराम झारीया (२८, वडधामना रोड) असे मृतकाचे नाव आहे. सुरेंद्र मूळचा मध्य प्रदेश येथील मंडला जिल्ह्यातील रहिवासी होता. रविवारी दुपारी वानाडोंगरी मार्गाने पिक्स कंपनीजवळून जात असताना मोटारसायकल गिट्टीच्या ढिगाऱ्यावर चढली. यात त्याच्या डोक्याला मार लागला व तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतच एका बाराचाकी ट्रकखाली येऊन पादचाऱ्याचा मृत्यू झाला. रामेश्वर रघुनाथ लोणारे (३६, आठवा मैल, वाडी) असे मृतकाचे नाव आहे. ते रविवारी रात्रीच्या सुमारास आठवा मैल येथून रस्ता ओलांडत होते. एमएच २८-बीबी-७९३३ या ट्रकने त्यांना धडक दिली व त्यात रामेश्वर यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांचे भाऊ ज्ञानेश्वर लोणारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिस ठाण्यात अजहर बेग गुलाम बेग (२५, वाशिम रोड, अकोला) या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करत, त्याला अटक करण्यात आली.