राकेश घानोडेनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुलढाणा जिल्ह्यातील एका खून प्रकरणात मृताच्या आरोपी भावाची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली; तर वहिनीसह तिघांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले. आरोपी भाऊ अत्यंत निर्दयीपणे वागला, असे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले.
संजय सुराडकर (३५) असे भावाचे नाव असून, तो जानुना येथील रहिवासी आहे. निर्दोष आरोपींमध्ये वहिनी मनीषा (३२), तिची बहीण मंगला काकडे (५०) व भाचा बंटी (२८) यांचा समावेश आहे. मृताचे नाव गणेश सुराडकर होते. गणेश व संजय एकाच घरात वेगवेगळे राहत होते. १२ मे २०१६ रोजी गणेशची पत्नी वर्षा व मनीषाचे घरगुती कारणावरून भांडण झाले. ते भांडण विकोपाला गेले. दरम्यान, मनीषा व मंगलाने गणेशच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकली. बंटीने गणेशला पकडून ठेवले तर, संजयने गणेशचा चाकूने भोसकून खून केला, अशी तक्रार होती. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी सत्र न्यायालयाने चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. आरोपींच्या वतीने ॲड. राजेंद्र डागा यांनी कामकाज पाहिले.