नागपूर : चहा व पान टपरीच्या जागेवरून वाद झाल्यानंतर तीन मित्रांचा शहाळे कापण्याच्या सत्तूरने निर्घृण खून करणारा नररुपी सैतान राजू छन्नूलाल बिरहा (५५) याला सत्र न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्कामोर्तब करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा खटला उच्च न्यायालयासमक्ष सादर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांनी मंगळवारी या खटल्यावर अंतिम सुनावणी करण्यासाठी १९ जून ही तारीख दिली.
सत्र न्यायालयाचे न्या. पी. वाय. लाडेकर यांनी २८ डिसेंबर २०२२ रोजी बिरहाला फाशीची शिक्षा सुनावली. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ३६६ अनुसार या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे. या शिक्षेविरुद्ध बिरहाने उच्च न्यायालयात अपील देखील दाखल केले आहे. सत्र न्यायालयाने फाशीवर शिक्कामोर्तबासाठी पाठविलेला संदर्भ व आरोपीचे अपील यावर उच्च न्यायालय एकत्र अंतिम सुनावणी करणार आहे.
समाजाला हादरवून सोडणारी ही घटना १७ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी १० च्या सुमारास वागदरा शिवार, ता. हिंगणा येथे घडली होती. मृतांमध्ये सुनील हेमराज कोटांगळे (३१), आशिष ऊर्फ गोलू लहुभान गायकवाड (२६) व कैलाश नारायण बहादुरे (३२) यांचा समावेश आहे. आरोपी राजू बिरहाने अत्यंत क्रूर व अमानवीय पद्धतीने हा गुन्हा केला. त्याने आधी बहादुरेवर हल्ला केला होता. कोटांगळे त्याला वाचविण्यासाठी गेला असता, शरीरात सैतान संचारलेला बिरहा बहादुरेला सोडून कोटांगळेवर तुटून पडला.
बिरहाने कोटांगळेच्या पोटावर, गळ्यावर व डोक्यावर सत्तूरचे सपासप वार केले. तो कोटांगळेला ठार करीत असताना जखमी बहादुरे व गायकवाड संदेश सिटीच्या रस्त्याने पळून गेले. त्यामुळे बिरहारने बहादुरेला पाठलाग करून पकडले व त्याचाही निर्घृण खून केला. दरम्यान, दूरपर्यंत पळून गेलेल्या गायकवाडला बिरहाने दुचाकीवरून पाठलाग करून पकडले व त्यालादेखील जाग्यावरच ठार मारले.
आरोपी बिरहा व कोटांगळे हे दोघेही वृंदावन सिटी गृह प्रकल्पापुढे चहा व पान टपरी चालवित होते. सत्र न्यायालयाने प्रकरणातील दुसरा आरोपी कमलेश ऊर्फ रघुवीर पंचमलाल झारिया (३३) याला संशयाचा लाभ देऊन निर्दोष सोडले आहे. दोन्ही आरोपी गुमगाव येथील रहिवासी आहेत. उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने अनुभवी ॲड. संजय डोईफोडे तर, आरोपीतर्फे ॲड. सुमित जोशी यांनी कामकाज पाहिले.
बिरहा कुख्यात गुन्हेगार
राजू बिरहा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध नागपुरातील सदर, अंबाझरी व सोनेगाव पोलीस ठाण्यातही विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला हद्दपार केले होते.