नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीची उपनिवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर बसपा ऐन वेळेवर निवडणुकीच्या मैदानातून बाद झाली. तांत्रिक त्रुटींमुळे पक्षाच्या उमेदवारांना एबी फार्म मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला.
बसपाचे वरिष्ठ नेते यासंदर्भात बोलायला तयार नाही; परंतु कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की, पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्याकडून जे पत्र प्रदेश कार्यालयाला प्राप्त झाले. त्यात वर्ष २०२० लिहिले होते. निवडणूक आयोगाने हे पत्र मान्य केले नसते. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारांना एबी फार्म दिले नाही. आता असा दावा केला जात आहे की, हे उमेदवार बसपाच्या पॅनेलवर निवडणूक लढतील. ते पक्षाचा झेंडा वापरू शकतील. परंतु, त्यांना पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह मिळणार नाही.
--------------
वंचित बहुजन आघाडी ४१ जागांवर लढणार
नागपूर : वंचित बहुजन आघाडीने जि.प.च्या सर्व १६ आणि पंचायत समितीच्या ३१ पैकी २५ अशा एकूण ४१ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या सर्व उमेदवारांनी पक्षाच्या एबी फार्मवर अर्ज सादर केला असल्याचे ‘वंचित’चे विवेक हाडके यांनी सांगितले.