नागपूर : महापालिकेच्या निवडणुका लांबण्याची चिन्हे असली तरी बहुजन समाज पक्षाने मात्र पक्ष बांधणीचे काम थांबविलेले नाही. बसपाने सध्या ‘महापौर बनाओ अभियान’ हाती घेतले आहे. यासाठी सेक्टर बांधणीचा कार्यक्रम राबविला जात आहे. महापालिकेच्या ४० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठरविले असून, बसपाला सोबत घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला महापौर बसविता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण केली जाईल, असा दावा बसपा नेते करीत आहेत.
२०१७च्या निवडणुकीत बसपाचे १० नगरसेवक विजयी झाले होते. यापैकी बसपाकडून नागपूर लोकसभेची निवडणूक लढलेले मोहम्मद जमाल यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. उर्वरित ९ नगरसेवक पुन्हा बसपाच्या तिकिटावर लढतील, ते कुठल्याही पक्षात जाणार नाहीत, असा बसपा नेत्यांचा दावा आहे. बसपाचे प्रदेश महासचिव व नागपूर झोनचे प्रभारी नागोराव जयकर यांच्या नेतृत्त्वात विधानसभानिहाय बैठका सुरू झाल्या आहेत. सोमवारी दक्षिण नागपूर, दक्षिण-पश्चिम व पूर्व नागपूरची बैठक आटोपली. मंगळवारी पश्चिम नागपूर व मध्य नागपूर मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. एका विधानसा मतदारसंघात ३० ते ३२ सेक्टर आहेत. एका सेटक्टरमध्ये १० बूथ असतात. सध्य:स्थितीत सेक्टर बांधणी सुरू आहे. पुढील महिन्यात बूथ बांधणीचा कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे नागोराव जयकर यांनी सांगितले.
नेतेमंडळी घेणार पक्ष बांधणीचा आढावा
१ सप्टेंबर रोजी प्रदेश प्रभारी खा. डॉ. अशोक सिद्धार्थ व नितीन सिंग नागपूरला येत आहेत. हिंदी मोर भवन येथे कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या सभेत पक्षाच्या एकूणच बांधणीचा आढावा घेतला जाणार असून खरोखर पदाधिकारी व कार्यकर्ते नियुक्त करण्यात आले आहेत का, याची पडताळणी केली जाणार आहे.
दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जागांवर फोकस
महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बसपाच्या उमेदवारांवर अधिक फोकस केला जाणार आहे. या सर्व उमेदवारांची एक स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे. तीत त्यांचे मत जाणून घेतले जाईल तसेच ते पुन्हा लढण्यासाठी इच्छुक आहेत का, याची पडताळणी केली जाईल. संबंधित उमेदवारांच्या अपेक्षा व अडचणी काय आहेत हे जाणून घेत त्यांना रसद पोहोचविण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.