मायावतींनी करावे नेतृत्व : राजेंद्र गवई यांची साद नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारलेल्या रिपाइं व बसपाने एकत्र येऊन निवडणूक लढवावी. इतकेच नव्हे तर मायावती यांनी कांशीराम यांचा पक्ष चालवण्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षात यावे आणि अध्यक्षपद घ्यावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (गवई) महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी येथे केले. एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता लोकमतशी बोलत होते. गवई म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही आमच्या पक्षाच्यावतीने स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी लहान-लहान पक्षांना सोबत घेतले जाईल. परंतु सर्व रिपाइं नेत्यांनी एकत्र येऊन या निवडणुका लढवाव्यात अशी अपेक्षा आहे. त्यासाठी केवळ रिपाइं गटांनीच नव्हे तर बसपानेसुद्धा सोबत येण्याची गरज आहे. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी काँग्रेसकडून आमदारकी तर रामदास आठवले यांनी भाजपकडून खासदारकी घेतली आहे. त्यामुळे त्यांना थोडी अडचण होऊ शकेल, मात्र त्यांनी आपले हितसंबंध सोडून यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे, ज्येष्ठ नेते एन.आर. सुटे, हेमंत ढोले, अमोल इंगळे उपस्थित होते. (प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचे दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य या नात्याने अभिनंदन. दीक्षाभूमीच्या विकासासाठी एक आराखडा मुख्यमंत्र्यांनी तयार केला आहे. तो स्मारक समितीच्या सदस्यांनाही दाखविण्यात आला होता. अतिशय सुंदर आराखडा तयार करण्यात आला आहे, असेही डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले.
बसपा-रिपाइंने एकत्र येऊन निवडणूक लढवावी
By admin | Published: March 14, 2016 3:25 AM