नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय बहुजन समाज पार्टीने घेतला आहे. काँग्रेस व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेसने तर आरएसएसचा उमेदवार आयात करून आपला खरा चेहरा उघड केला आहे, असा आरोप करीत बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी बसपाचे नगरसेवक या निवडणुकीत कुणालाही मतदान करणार नाही, असे सोमवारी स्पष्ट केले. या निर्णयामुळे आधीच संख्याबळ जास्त असलेल्या भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे.
ॲड. संदीप ताजने म्हणाले, काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष आम्हाला समांतर आहेत. फुले-शाहु-आंबेडकर विचारांना मारक आहेत. काँग्रेस ही आरएसएसच्या विचाराला पुरक आहे हे काँग्रेसने आरएसएसचा उमेदवार घेऊन सिद्ध केले आहे. काँग्रेस नेहमीच भाजपला जीवंत ठेवण्यासाठी संजीवनी देत आली आहे. विधान परिषदेच्या रिंगणात बसपाचा उमेदवार नाही. त्यामुळे बसपाचे १२ नगरसेवक कुणालाही मतदान न करता तठस्थ राहतील, अशी घोेषणा ताजने यांनी केली.
बसपासह अपक्ष मतदारांची काँग्रेसला साथ मिळाल्यानंतरही भाजपचे संख्याबळ जास्त आहे. अशात बसपाला सोबत घेत लढत देण्याचे प्रयत्न काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर यांच्याकडून सुरू होते. मात्र, आता बसपाने तठस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महापालिका स्वबळावर लढणार
नागपूर महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. या निवडणुकीतही काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष दूर ठेवूनबसपा स्वबळावर लढेल. निळ्या झेंड्याखाली बसपा जास्तीत जास्त जागा जिंकेल व बसपाचा महापौर करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असे निवडणुकीनंतर पहायला मिळेल, असा दावाही ॲड. ताजने यांनी केला.