नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत बसपाला दारुण पराभव पत्करावा लागला. हा पराभव पक्षाला चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच पक्षाच्या पराभवासंदर्भात महाराष्ट्रातही मंथन करण्यात येत आहे. याअंतर्गत येत्या ९ आणि १० एप्रिल रोजी पुण्यातील कॅम्प परिसरात दोन दिवसीय प्रशिक्षण व चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात राज्यभरातील आजी-माजी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशसह पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत बसपाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. सर्वाधिक फटका उत्तर प्रदेशात बसला. एक-दोन नव्हे तर तब्बल चार वेळा उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणाऱ्या बसपाला केवळ एक आमदार निवडून आणता आले. इतकेच नव्हे तर बसपाला होणाऱ्या मतदानाची टक्केवारी सुद्धा प्रचंड घटली आहे. उत्तर प्रदेशात बसपाच्या जागा कमी झाल्या तरी मतदानाच्या टक्केवारीत फरक पडत नव्हता. २०१७ च्या निवडणुकीत बसपाला २२ टक्के मतदान झाले होते. यावेळी ते १२.८८ टक्केवर आली. तब्बल ९.३५ टक्केे इतके बसपाचे मतदान घटले आहे. त्यामुळेच हा पराभव बसपाला चांगलाच जिव्हारी लागला आहे. परिणामी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी देशपातळीवरील संघटनेची पुर्नबांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवरच ही चिंतन बैठक बोलावण्यात आली आहे.
- सुनील डोंगरे विदर्भाचे प्रमुख
ॲड. सुनील डोंगरे यांची प्रदेश प्रभारी म्हणून निवड करण्यात आली असून त्यांच्यावर विदर्भाची स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे. डोंगरे हे मूळचे वर्धा येथील आहेत. त्यांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील प्रदेश कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महेंद्र रामटेके,रंजना ढोरे, उत्तम शेवडे, विजकुमार डहाट,संदीप मेश्राम, राजीव भांगे, चंद्रशेखर कांबळे, प्रताप सूर्यवंशी, सुरेखाताई डोंगरे, ओपूल तामगाडगे, चंद्रशेखर कांबळे, अमित सिंग, विलास सोमकुवर, राजकुमार बोरकर, महेश सहारे, अजय डांगे, सागर लोखंडे, योगेश लांजेवार, संजय जयस्वाल, इब्राहीम टेलर उपस्थित होते.