नागपूर : आंबेडकरी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते आणि बामसेफ तसेच बहुजन समाज पक्षाचे संस्थापक सदस्य राहिलेले सुप्रसिद्ध लेखक ॲड. राम खोब्रागडे यांचे बल्लारपूर येथे हृदयविकाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. बल्लारपूर येथे त्यांच्यावर रविवारी अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि माजी नगरसेविका वसंतमाला खोब्रागडे, दोन मुले, स्नुषा आणि नातवंडे असा परिवार आहे.
बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांचे ते निकटचे सहकारी होते. बामसेफ, डी. एस. फोर आणि बसपाचे ते संस्थापक सदस्य होते. बामसेफचे राष्ट्रीय सचिव म्हणून फुले आंबेडकर चळवळ देशभर रुजविण्यात ॲड. खोब्रागडे यांचा मोठा वाटा आहे. ‘द ऑप्रेस्ड इंडियन’, ‘बहुजन संघटक’, ‘बहुजन टाइम्स’, ‘इकाॅनाॅमिक अपसर्ज’, ‘आर्थिक उत्थान ॲण्ड बहुजन साहित्य’ या सर्व प्रकाशनांचे ते संपादक होते. हिंदी मासिक ‘जनआंदोलन का सजग प्रहरी’चे ते मुख्य संपादक होते.
‘इंटरनॅशनल दलित ऑर्गनायझेशन’चे ते संस्थापक सचिव होते. क्वाललम्पूर येथे झालेल्या पहिल्या जागतिक दलित परिषदेचे ते आयोजक होते. ‘इंडियन काॅन्स्टिट्यूशन अंडर कम्युनल अटॅक’, ‘सोशल एज्युकेशन फाॅर सोशल जस्टीस’ ही त्यांची पुस्तके अभ्यासकांसाठी उपयुक्त आहेत.