लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे बुद्ध महेत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, भरतनाट्यम्सह बुद्ध कला व संस्कृतीचे दर्शन पुन्हा एकदा नागपूरकरांना दीक्षाभूमीवर होणार आहे.नागपूर बुद्धिस्ट सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद यांच्यावतीने येत्या २३ ते २७ जानेवारी दरम्यान दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सव होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना धम्मचारी ऋतायुष यांनी सांगितले की, २३ तारखेला सायंकाळी ६.३० वाजता विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. यामध्ये नागपुरातील शाळांमधील विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग राहील. त्रिरत्न व्याख्यानमाला हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य राहिले आहे. यंदा राष्ट्र, लोकशाही आणि बौद्ध धर्म यावर व्याख्यानमाला होतील. चित्रपट महोत्सवांतर्गत ‘साऊंड आॅफ सायलेन्स’, ‘पपिलिया बुद्धा’ आणि ‘लिटिल बुद्धा’ हे चित्रपट दाखविले जातील. ‘भारतीय रंगमंचाचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष’ हे नाटक बहुजन रंगभूमीद्वारे सादर केले जाईल. यावेळी बिझिनेस टू कस्टमर ही कार्यशाळाही होईल. आर्ट गॅलरीमध्ये विविध पेंटिंग्सचेही प्रदर्शन भरविले जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर्षी महोेत्सवांतर्गत डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉल स्पर्धा होईल, हे विशेष. पुढच्या वर्षी बुद्ध महोत्सवाला दहा वर्षे पूर्ण होतील. त्यानिमित्त पुढील वर्षी महिनाभर चालेल असा भव्य महोत्सव आयोजित केला जाणार असल्याची माहितीही धम्मचारी ऋतायुष यांनी यावेळी दिली.पत्रपरिषदेत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक खिरवडकर, उपसंचालक मोहन पारखी, धम्मचारी नागकेतू, डॉ. सुनील तलवारे, डॉ. त्रिलोक हजारे उपस्थित होते.बुद्धाला संबोधी प्राप्तीचा भव्य देखावाबुद्ध महोत्सवाचे सर्वात खास आकर्षण म्हणजे येथील मुख्य विचारपीठ हा असतो. स्टेजचा मागचा बॅकग्राऊंड हा दरवर्षी विशेष असतो. यंदा तथागत भगवान बुद्धाला संबोधी प्राप्ती झाली ते दृश्य स्टेजवर साकारण्यात येत आहे. आर्टिस्ट विजय इंगळे व त्यांची संपूर्ण चमू यासाठी परिश्रम घेत आहे.