लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्ध यांच्या शांती व अहिंसा या मार्गाचाच सर्व जगाने स्वीकार केला असून, त्यांचा विश्वशांतीचा संदेश हा जगासाठी मार्गदर्शक ठरला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था (बार्टी) व समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय वैशाख दिन (बौद्ध पौर्णिमानिमित्त) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित दोन दिवसीय ‘आंतरराष्ट्रीय शांती व समता’ परिषदेचे शनिवारी थाटात उद्घाटन पार पडले. उद्घाटन सत्राप्रसंगी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले, पशूसंवर्धनमंत्री महादेव जानकर, रामटेकचे खा. कृपाल तुमाने, आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, आ. डॉ. मिलिंद माने, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्या अॅड. सुलेखा कुंभारे, शिक्षण तज्ज्ञ डॉ. विश्वनाथ कराड, गिरीश गांधी, माजी कुलगुरू एस. एन. पठाण, अब्दुल फलाही, आचार्य लोकेश मुनी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबतच बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, थायलंड, भूतान, फिलिपाईन्स, लडाख तसेच लंडन येथील भंते व विद्वान उपस्थित होते. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सर्वांचे स्वागत करण्यात आले.नागपूर ही ऐतिहासिक भूमी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी पवित्र दीक्षाभूमीत बौद्ध धमाची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांना दिली. देश-विदेशातील बुद्धिस्ट विचारवंत तसेच शांततेचा पुरस्कार करणारे सर्वधर्मीय धर्मगुरू, तत्त्ववेत्ते या नागपूर नगरीमध्ये आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेच्या माध्यमातून एकत्र आले, ही बाब अभिमानास्पद असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. महादेव जानकर, खा. कृपाल तुमाने, विश्वनाथ कराड, आचार्य लोकेश मुनी, सुलेखा कुंभारे यांनीही विचार व्यक्त केले.बुद्धांच्या तत्त्वज्ञानाच्या अनुसरणाने जगभर प्रज्ञा, शील व करुणा यांचा संदेश पोहचेल, अशी आशा प्रास्ताविकपर भाषणात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली. संचालन शैलजा शेलगावकर व धर्मेश धवनकर यांनी केले. सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी आभार मानले.