वैशाख पौर्णिमा : शहरात बुद्ध जयंती उत्साहातनागपूर : तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आज शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील प्रत्येक वस्त्यांमध्ये, विहारात बुद्ध वंदना घेण्यात आली. विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले. एकूणच शनिवारी बुद्धं शरणं गच्छामीने आसमंत निनादले होते. बुद्धनगरात संगीतमय बुद्ध पहाट बुद्ध जयंतीनिमित्त शनिवारी कामठी मार्गावरील बुध्दनगरातील बुध्दपार्क येथे पहाटे ५.१५ वाजता ‘बुध्द पहाट’ हा संगीतमय कार्यक्रम पार पडला. प्रसिद्ध् गायिका छाया वानखेडे-गजभिये आणि सहकारी यांनी बुध्द व भीम गीते सादर केली. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई हे प्रमुख अतिथी होते.प्रीती धाकडे, प्रीती गजभिये, श्याम जैन, मिलिंद जिभे यांनी गीत सादर केले. त्यांना राहुल देशमुख (तबला),नागेश गेडाम(की बोर्ड), उल्हास चिटमुलवार (आॅक्टोपॅड), विनीत (ढोलक), लेखराज वंजारी (गिटार), राज चौधरी (हार्मोनियम व निवेदन) वाद्यवृंदाची साथसंगत केली.समता सैनिक दलाचा बुद्धगयेत अभिवादन मार्च नागपुरातील समता सैनिक दलाच्या शेकडो सैनिकांनी बुद्ध जयंतीनिमित्त बुद्धगयेत महाबोधी महाविहारापर्यंत अभिवादन मार्च काढला. अतिशय शिस्तबद्ध असलेल्या या मार्चने जगभरातून आलेल्या अनुयायांचे लक्ष वेधून घेतले. समता सैनिक दलाचे मार्शल विलास नरांजे यांनी या मार्चचे नेतृत्व केले. यात केंद्रीय संघटक मार्शल सुनील सारीपुत्त, संदेश गवले, अभयकुमार, मनोजकुमार वर्मा यांच्यासह शेकडो सैनिकांचा समावेश होता. यावेळी आयोजित कार्यक्रमात समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अॅड. विमलसूर्य चिमणकर, भंते यश, भंते रेवत बोधी, अशोककुमार गौतम, प्रकाश दार्शनिक आदींनी मार्गदर्शन केले. भारतीय बौद्ध महासभा भारतीय बौद्ध महासभा नागपूर शहराच्यावतीने बुद्ध जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी शहर महासचिव मिलिंद डांगे, शहराध्यक्ष भीमराव फुसे, आनंद सायरे, गोपीचंद आंभोरे, सुरेश पाटील, हरीदास बेलेकर, अंकुश गणवीर आदी उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीपरमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे बुद्ध जयंतीनिमित्त शनिवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वातील भिक्षुसंघाने दीक्षाभूमी येथील मध्यवर्ती स्मारकात तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, सदस्य विलास गजघाटे, एन.आर. सुटे, आनंद फुलझेले, विजय चिकाटे, डॉ. सुधीर फुलझेले, विजय बन्सोड, देजारी रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते. दीक्षाभूमीवर हजारोंनी घेतली दीक्षा पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशीलसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञा ग्रहण करीत भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते शनिवारी हजारो नागरिकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या प्रसंगाने दीक्षाभूमीवरील १९५६ सालच्या त्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याची आठवण ताजी करून दिली. निमित्त होते बुद्ध पौर्णिमेचे. तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समारोह समिती यांच्या संयुक्त विद्यमने शनिवारी धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या धम्मदीक्षा सोहळ्यात दीक्षा घेण्यासाठी अगोदरच नाव नोंदणी करण्यात आली होती. दीक्षा घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दीक्षा घेणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांचा सामवेश होता. यानंतर भिक्षु संघाला दान व भोजनदान देण्यात आले.
बुद्धं शरणं गच्छामीने आसमंत निनादले
By admin | Published: May 22, 2016 2:59 AM