निशांत वानखेडेनागपूर :
उमरेड-कऱ्हांडला परिसरात तथागत बुद्धांनंतर बाैद्धमय झालेल्या काळाच्या पाऊलखुणा दर्शविणारे असंख्य पुरावे सापडत आहेत. सम्राट अशाेककालीन विशाल स्तूप, शिलालेख, पाषाणावर काेरलेल्या सचित्र गाेष्टी व नागवंशीय लाेकांच्या पाऊलखुणांचे दर्शन या भागात हाेत आहे. काही बुद्धकालीन अवशेष २२०० वर्षे जुने, तर काही ४००० वर्षांपूर्वी प्रागैतिहासिक काळाचे आहेत.
मागील १५-२० वर्षांपासून या अवशेषांवर संशाेधन करणारे वायसीसीईच्या गणित व मानविकी विज्ञान विभागाचे डाॅ. आकाश गेडाम यांनी या अवशेषांची माहिती दिली. साधारण: १९६९-७० च्या काळापासून या भागात उत्खनन हाेत आहे. ही वारसास्थळे दक्षिणेच्या मार्गावर आहेत. पवनीजवळच्या जंगलात जगन्नाथ टेकडी येथे बुद्धांचे विशाल स्तूप हाेते. तथागताचा एक दंत पुरून हा स्तूप उभारल्याचे पुरावे सापडतात. हा स्तूप भग्नावस्थेत आहे. मात्र, उत्खननात इ.स.पूर्व दुसऱ्या व इ.स.नंतरच्या दुसऱ्या शतकापर्यंतच्या कालखंडातील लेख मिळाले आहेत.
असे मिळाले पुरावेस्तुपाच्या काही खांबावर सात वेटाेळे मारून पाच फणे असलेला नाग कमळावर बसलेला आहे. मध्ये भद्रासन आणि वर बाेधिवृक्ष अंकित असून साेबत ‘मुचरिंद नागाे’ असा आशयाभिधान काेरलेले आहे. संपूर्ण भारतात हे एकमेव शिल्प आहे. एका माेठ्या पाषाणावर हत्तीवर बुद्धाचे अवशेष (दंत) वाजतगाजत नेत असल्याचे सचित्र दर्शन घडते. त्या काळात बुद्धाची मूर्ती नव्हती, पण त्यांच्या जीवनाशी निगडित गाेष्टी काेरलेल्या आढळतात. हा स्तूप सामान्यांच्या दानातून उभारण्यात आला. हे सर्व नागवंशीय हाेते.
इतर महत्त्वाची वारसास्थळे- उमरेड-कऱ्हांडलामध्ये जंगलात काही गुंफा आहेत. त्यातील सातभाेकी (सात दरवाजे) गुंफा व जाेगीनकुपी या हाेत. जाेगीनकुपी ही भिक्षुणीची गुंफा असल्याचे शिलालेखातून कळते. - फाेंड्याच्या नाल्याशेजारी उखळगाेटा येथे लेणी आहेत. लेणीच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूस ‘वंदलकपुतस अपलसंमती कम’ असा लेख आहे. त्याचा अर्थ ही लेणी वंदलकचा पुत्र अपल याने काेरली आहेत, असा हाेताे.- दुसऱ्या अभिलेखावर ‘ओकियस’ असे काेरले आहे. हे नाव इराणी वा ग्रीक राेमनाचे असावे. लेणी काेरण्यासाठी ओकियस नावाच्या विदेशी व्यक्तीने दान केले, असा अर्थ हाेताे.- पाषाणाच्या खालच्या बाजूस गाेलाकार कुपल्ससाेबत ‘अधिक’चे चिन्ह अंकित आहे. याचा संबंध ४ हजार वर्षांपूर्वी प्रागैतिहासिक काळाशी येताे. असे अवशेष मध्य प्रदेशच्या भीमबेटका व दरीकाचट्टान येथे सापडतात.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागवंशीयांची भूमी म्हणून नागपुरात बाैद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यांच्या दूरदृष्टीचे पुरावे नागपूर व आसपासच्या परिसरात जागाेजागी सापडत आहेत. मात्र, या वारशांचे हवे तसे उत्खनन झाले नाही. आणखी उत्खनन व संशाेधनाची गरज आहे.- डाॅ. आकाश गेडाम, पुरातत्त्व संशाेधक