लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अयोध्येमध्ये राममंदिर प्रमाणेच लोकवर्गणीतून स्वतंत्र जागेत बुद्ध विहार उभारण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.
सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात आयोजित प्रभाकर दुपारे लिखीत बुद्धमय थायलंड या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूपेश थूलकर, डॉ. सच्चिदानंद फुलेकर, चंद्रबोधी पाटील, डॉ. पूरण मेश्राम, दादाकांत धनविजय उपस्थित हाेते.
आठवले म्हणाले, अयोध्या ही प्राचीन साकेत नगरी होती. आजही या नगरीत बुद्ध धम्माची पाळेमुळे रुजली आहेत. येथे राममंदिराची निर्मिती होत आहे. त्या वादात न पडता लोकवर्गणीतून बौद्ध विहाराची स्वतंत्रपणे निर्मिती केली जाईल. आपल्या देशात बौद्ध धम्माचे स्वतंत्रपणे संशाेधन होणे गरजेचे आहे.
यावेळी लेखक प्रभाकर दुपारे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत या मराठी पुस्तकाचे हिंदी, इंग्रजी व थाई भाषेत लवकरच भाषांतर होणार असल्याचे सांगितले.
राजन वाघमारे यांनी संचालन केले. तर बाळू घरडे यांनी आभार मानले.