नागपूर : ‘अहंकार आणि तृष्णेतून गटांची निर्मिती होते. सर्व संघ राहिले पाहिजे. एकीकरण हा मोठा विषय आहे. तो पोटतिडकीने हाती घेतला पाहिजे. नुसते बुद्धांचे तत्त्वज्ञान सांगून चालणार नाही. तर तो जगण्याचा भाग झाला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले.
बुद्धिस्ट अल्पसंख्याक संविधानिक भिक्खू संघाच्या वतीने दीक्षाभूमी येथे ‘संघयान संकल्प परिषद’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. परिषदेचे उद्घाटक पालकमंत्री नितीन राऊत होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बामसेफचे प्रमुख वामन मेश्राम, भदंत हर्षबोधी उपस्थित होते.
मनोहर म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ ला धम्मदीक्षा देऊन पूर्वीची जाती, पोटजाती व्यवस्था नाकारली; परंतु जुनी व्यवस्था पुन्हा येणार असल्याचे संकेत आहे. अनेक गोष्टी त्याचा इशारा देत आहे. हे समजण्याची गरज आहे. आपली लोक अनेक संघटना, गटात विखुरल्या आहेत. भिक्खू संघाचेही अनेक गट आहेत. सर्वांनी एकसंध झाले पाहिजे. बुद्धांनी भिक्खू संघाची स्थापना केली. बुद्धांनी त्याच वेळी याची बीजे पेरली आहेत. गणतंत्र, प्रजातंत्र ही व्यवस्था श्रमण संस्कृतीतून घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे. सध्याच्या काळात संघटनेचा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न पोटतिडकीने सोडविण्याची गरज आहे. सर्वच समाजाला जोडण्याची गरज आहे. तुमच्या वागणुकीतून बुद्धांचे त्रिशरण, पंचशील व्यक्त झाले पाहिजे. बुद्ध तुमच्या वाणीतून नाही तर करणीतून दिसायला हवे,’ असे ते म्हणाले. वामन मेश्राम यांनी सर्वांनी एकत्र राहण्याचे मत व्यक्त केले. भिक्खूंचाही एकसंध असायला हवे, असे ते म्हणाले.